पिंपरी : पिंपळे सौदागर येथे तरुणाने संगणकाच्या वायरच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेतलेल्या अवस्थेत मुलाला पाहिल्यानंतर त्याच्या आईला हृदयाचा तीव्र धक्का बसला. त्यात तिचा मृत्यू झाला. मुलाच्या आत्महत्येच्या घटनेनंतर मातेने प्राण सोडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव तन्मय दासगुप्ता (वय ३६) असे आहे. तर त्याचा मृत्यू झाल्याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू झालेल्या मातेचे नाव सुनैय्या दासगुप्ता (वय ६५) असे आहे.झुलेलाल सोसायटीत दासगुप्ता मायलेक राहत होते. तन्मयची बहीण जवळच राहण्यास आहे. सुनैय्या दासगुप्ता यांचा तन्मय हा एकुलता एक मुलगा होता. आयटी अभियांत्रिकीचे शिक्षण त्याने अर्धवट सोडले होते. त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरू होते. मानसोपचार तज्ज्ञाने दिलेल्या सल्ल्यानुसार काही दिवसांपासून त्याने औषध गोळ्या घेण्याचे बंद केले होते. तो कायम तणावाखाली वावरत होता. त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. प्रकृती खालावली होती. तन्मयने राहत्या घरात संगणकाच्या वायरने पंख्याला गळफास घेतला. ही बाब मंगळवारी सकाळी उघडकीस आली.पोलिसांनी दोघांचे मृतदेह उत्तरीय तपसणीसाठी रुग्णालयाकडे पाठविले. मुलाचा गळफासाने तर आईचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे.आईशी संपर्क साधला, मिळाला नाही प्रतिसादसुनैय्या दासगुप्ता व जवळच राहणारी त्यांची मुलगी सोनाली आशीष बराट या दोघी रोज सकाळी फेरफटका मारण्यासाठी एकत्रित जायच्या. नेहमीप्रमाणे सोनालीने सकाळी आईला फोन केला मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.मुलाच्या मृत्यूच्या मानसिक धक्क्याने आईनेही प्राण सोडल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी सांगवीपोलीस अधिक तपास करीत आहेत.
मुलाच्या आत्महत्येच्या धक्क्याने पिंपळे सौदागरमध्ये आईचा हृदयविकाराने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 1:20 AM