- पराग कुंकूलोळचिंचवड - महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयासाठी ड्रेनेज लाईन टाकताना अधिका-यांनी नियम धाब्यावर ठेवत रस्त्याची खोदाई केली. यामुळे मुख्य रस्ता बंद करण्यात आला. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा त्रास शुक्रवारी सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. अचानक शुक्रवारी पहाटे करण्यात आलेल्या खोदाईची माहिती स्थानिक नगरसेवक व क्षेत्रीय अधिका-यांना नसल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे.रेल्वे स्टेशनजवळ खोदण्यात आलेल्या या रस्त्याबाबत येथील कामगारांना विचारणा केली असता ब प्रभाग क्षेत्रीय कार्यालय व नव्याने बांधकाम होत असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकांच्या इमारतीसाठी स्ट्रॉम वॉटर लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम कोणाच्या आदेशाने सुरू आहे याबाबत त्यांनी बोलणे टाळले. या कामाबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केल्याने ‘लोकमत’ प्रतिनिधीने ब प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात संपर्क साधला असता हे काम अ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असल्याने आम्ही काहीही माहिती सांगू शकत नसल्याचे सांगितले.प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञयासाठी अ प्रभागाच्या क्षेत्रीय अधिकारी एम. ए. दुरगुडे यांच्याकडे या कामाबाबत चौकशी केली असता मला याबाबत काहीही माहिती नाही. मी स्थापत्य विभागाकडे माहिती घेऊन सांगते, असे सांगितले. काही वेळातच त्यांनी येथील खोदकाम हे ब प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी खोदण्यात आले असल्याचे सांगितले. ब प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी सुधीर खोत यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले.विना परवाना केली खोदाईचिंचवडमधील या खोदकामाच्या प्रक्रियेची माहिती घेतली असता धक्कादायक प्रकार समोर आला. पालिकेच्या स्थापत्य विभागाने ठेकेदाराला हे काम रात्रीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र ठेकेदाराने दुपारपर्यंत हे काम पूर्ण केले नव्हते. येथील मुख्य रस्ता दोन्ही बाजूंनी खोदण्यात आल्याने नागरिकांची धावपळ झाली. हे काम महानगरपालिकेच्या ब प्रभाग क्षेत्रीय कार्यलयासाठी करण्यात येत असल्याने रस्ता खोदण्याबाबतचे नियम धाब्यावर बसवत विनापरवाना हा रस्ता खोदण्यात आल्याचे वास्तव ‘लोकमत’ने उजेडात आणले आहे.वाहतूक विभागाची नाही परवानगीपालिका प्रशासनाने आज चिंचवडमधील ब प्रभाग कार्यालयाच्या स्ट्रॉम वॉटर लाइन टाकण्याचे काम रात्रीत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र रात्रीत काम पूर्ण झाले नसल्याने अनेकांना रस्ता बंदचा त्रास सहन करावा लागला. यामुळे आज या कामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. रस्ता बंद करण्यासाठी पालिका प्रशासनाने वाहतूक विभागाची परवानगी घेणे महत्त्वाचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत मनमानी पद्धतीने काम करण्यात आले. या कामाची वर्क आॅर्डर काढण्यात आली असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने ‘लोकमत’ प्रतिनिधीला सांगितले. मात्र वर्क आॅर्डर दाखविण्याचे टाळले.
महापालिका अधिकाऱ्यांकडूनच नियमांची पायमल्ली करून खोदकाम, नागरिक, विद्यार्थ्यांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 1:32 AM