पिपरी : अर्थसंकल्पात पाणीपट्टीत भरमसाट वाढ करून नागरिकांवर बोजा टाकला आहे. शहरात पाण्याचा तुटवडा भासत आहे. पुरेसे पाणी मिळत नाही. अशा स्थितीत पाणीपट्टी वाढ करण्याचा घाट घातला जात आहे. अनधिकृत नळजोडसंख्या १२ हजारांच्या घरात आहे, त्यांना बिल पाठविले जात नाही. पाणीपट्टी वसूल होत नाही. या अनधिकृत बांधकामांची नोंदणीत अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत शास्ती माफ केली म्हणून पेढे वाटप करण्याचा प्रकार म्हणजे सत्ताधारी भाजपाकडून जनतेची दिशाभूल असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला आहे.अवैध बांधकामे नियमितीकरणाचा निर्णय झाला असे सांगितले. आतापर्यंत केवळ नऊ प्रकरणे महापालिकेकडे नियमितीकरणासाठी आली. ती सुद्धा बांधकाम व्यावसायिकांची आहेत. सामान्य नागरिकांचे एकही प्रकरण नाही. अनधिकृत चार मजली इमारती उभारली जाईपर्यंत प्रशासनाचे लक्ष जात नाही, इमारत बांधून पूर्ण झाल्यानंतर कारवाई होते. त्यावरून प्रशासन व सत्ताधाºयांचा संगनमताचा कारभार दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल, असा आरोप विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केला.महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला एक वर्ष पूर्ण होत आहे. ‘अनधिकृत बांधकामे नियमित करू, शास्ती माफ करू’ अशा वल्गना निवडणुकीपूर्वी केल्या. शहरातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले, अशा जाहिराती झळकावून स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र, सत्तेत आल्यानंतर नागरिकांवर कराचा बोजा टाकला आहे. दिशाभूल करणाºया भाजपाने नागरिकांची माफी मागून राजीनामे द्यावेत, अशी मागणी योगेश बहल यांनी पत्रकार परिषदेत केली.करवाढीविरोधात सर्वपक्षीय आंदोलनपिंपरी : पाणीपट्टी वाढ केल्याप्रकरणी सत्ताधारी भाजपाविरोधात शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महापालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. ‘चाटून खा -पुसून खा, भाजपा’ अशा भाजपाविरोधात घोषणा देण्यात आल्या. महापालिकेत दुपारी दोनला सर्वसाधारण सभा होणार होती. तत्पूर्वी दीड वाजताच प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन केले.शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख योगेश बाबर, माजी शहरप्रमुख भगवान वाल्हेकर, राहुल कलाटे, सुलभा उबाळे, युवराज कोकाटे, रोमी संधू, तसेच मनसेचे सचिन चिखले, रुपेश पेटकर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. जनतेची लूट थांबवा, पाणीपट्टी वाढ रद्द करा अशी जोरदार घोषणाबाजी या वेळी करण्यात आली. केवळ ठिय्या आंदोलनच नव्हे, तर आंदोलकांनी थेट महापालिका सभागृहात मोर्चा वळविला. सभा सुरू होण्यापूर्वी त्यांनी महापौरांसमोर पाणीपट्टीविरोधात घोषणाबाजी केली.लोटा वाजवून राष्ट्रवादीकडून निषेधपिंपरी : शास्तीबाबत राज्य सरकारचा निर्णय होत नाही, तोपर्यंत शास्तीकर वसूल न करता सामान्य कर स्वीकारण्यात यावा, अशी मागणी करीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी निषेध नोंदवला. पाणीपट्टीवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, नगरसेविकांनी हातात लोटा (तांब्या) घेऊन सत्ताधारी भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.महासभा सुरू होण्यापूर्वी महापौर नितीन काळजे यांच्यासमोर त्यांनी पाणीपट्टी दरवाढीचा विरोध केला. पुरेसे पाणी द्या, मगच पाणीपट्टी वाढ करा अशा घोषणा या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे देण्यात आल्या. अनधिकृत बांधकामे नियमित करावीत, महापालिकेने केलेली पाणीपट्टी दरवाढ आणि रिंग रोड रद्द करण्यात यावा. प्रस्तावित पाणीपट्टी लाभ कर गतवर्षीप्रमाणे ठेवावा, तसेच चोविस तास पाणीपुरवठा योजना त्वरित मार्गी लावावी अशी मागणी केली. या वेळी विरोधी पक्षनेते योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, प्रशांत शितोळे, दत्ता साने, वैशाली घोडेकर उपस्थित होते.सत्ताधारी भाजपाकडून पाणीपट्टी तसेच अन्य करांत मोठी वाढ करण्यात आली आहे. ही करवाढ सामान्य नागरिकांसाठी भुर्दंड आहे. सत्ताधाºयांनी असे निर्णय घेताना अन्य पक्षांच्या लोकांनाही विश्वासात घेणे गरजेचे आहे. मात्र सामान्य नागरिकांचा विचार न करता एकतर्फी निर्णय लादले जात आहेत. पाणीपट्टी, तसेच पाणीपट्टी लाभकरात वाढ केली आहे. शहरातील नागरिकांनी कशाकशाचे कर भरायचे? अशा प्रकारचा अन्याय किती दिवस सहन करायचा, म्हणून आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागला आहे. - सचिन चिखले, गटनेते, मनसे
टंचाईत पाणीपट्टीवाढीचा घाट, सत्ताधारी भाजपाकडून जनतेची दिशाभूल; सर्वपक्षीय विरोधकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 6:30 AM