हिंजवडी : येथील शिवाजी चौक व आयटीयन्ससाठी नव्याने तयार आलेला लक्ष्मी चौक म्हणजे अपघाताला हमखास निमंत्रण आहे. यात भर म्हणूनच की काय मेझा ९ कॉर्नर व फेज २ मधील विप्रो सर्कलदेखील यात मोठी भर टाकत आहेत. यामुळे हिंजवडीतील वाहतूक आता रामभरोसे आहे. वाहतूककोंडी दररोज ठरलेली आहे. अनधिकृत पार्किंगकडे प्रशासन काणाडोळा करते. कारण अशी कारवाई केल्यास आजी- माजी आणि स्वयंघोषित पुढा-याची दमदाटी आणि धमकीवजा फोन यामुळे अशा कारवाईचामागील अनेक वर्षांपासून मागमूसही नाही.शिवाजी चौक व लक्ष्मी चौक अपघातास निमंत्रणसकाळ-संध्याकाळ हिंजवडी येथील शिवाजी चौक म्हणजे अपघाताला निमंत्रण... कारण सकाळी ७ ते १२ ही आयटीयन्सची कामावर जाण्याची वेळ. यातच ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, अनेक मोठ्या बँकादेखील चौकातून हाकेच्या अंतरावर. महत्त्वाचे म्हणजे अनेक बांधकाम व्यावसायिक, पतसंस्था, हॉटेलदेखील चौकातच. मुळातच गायरान जमिनीत येणाºया चौका-चौकातून फेज २ कडील भाग या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. यामुळे वाहनांची संख्या मोठी असल्याने सर्व वाहतूक ठप्प होते. इथेच सर्व प्रकारची दुकाने, त्यांना पार्किंगची कसलीही व्यवस्था नाही. त्यामुळे सर्व वाहने रस्त्यावरच दुतर्फा. विशेषत: वाहतूक विभागाने अशा अनधिकृत पार्किंगवर मागील तीन-चार वर्षांत कारवाई केली नाही. त्यामुळे वाहतूक शाखेचा धाकच नाही.परिणामी या स्वयंघोषित पार्किंगला वाहतूक शाखेचाच वरदहस्त आहे की काय, असा समज सर्वसामान्य नागरिकांचा आहे. अशा परिस्थितीत वाहतूक विभागाचे काही कर्मचारी काही तास- इतबारे काम करतात. अशा परिस्थितीत आयटीयन्स कसेबसे रस्ता काढत कार्यालयाकडे जाताना दिसतात. अशा परिस्थितीतही चुकून एखाद्या वाहनास धक्का लागला, तर प्रसाद नक्की...लक्ष्मी चौक हा अपघाताला दुसरा पर्याय. मागील काही महिन्यांपासून या ठिकाणी लहान-मोठा अपघात घडला नाही, असा एकही दिवस नाही, असे येथील दुकानदार सांगतात.या चौकात सिग्नलच नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता हमखास. त्यातच वाहतूक विभागाचेही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष.यामुळे आता वाहनचालकांची सुरक्षा रामभरोसे. अनेकदा आवाज उठवूनही या चौकातील समस्या मात्र कायम आहेत. प्रतिभा तांबे नावाच्या तरुणीला याच चौकात जीव गमवावा लागला. परंतु प्रशासन अद्यापही सुस्तच आहे. यापुढे अजून कितीजीव गेल्यानंतर सिग्नलला मुहूर्त मिळणार अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.वाहतूक पोलीस गैरहजर : नागरिकांना त्रासमोठ्या प्रमाणात वाहतुकीचा ताण असलेला रस्ता म्हणजे हिंजवडी ते आयटी पार्क रस्ता. मेझा ९ हॉटेलशेजारील कॉर्नर म्हणजे जीव मुठीत घेऊनच प्रवास. कारण दुय्यम निबंधक कार्यालय, हॉटेल, पेट्रोल पंप या ठिकाणी आहेत. त्यामुळे या परिसरात मोठी गर्दी. वाहतूक पोलीस येथे कधीतरीच असतात. फेज २ मधील विप्रो सर्कल हा जाणकारांसह सर्वसामान्य नागरिकांना पडलेला मोठा प्रश्न आहे.मुळातच वाहतुकीच्या इतर पर्यायाला केराची टोपली दाखवत येथे सर्कल तयार करण्याची आंतरराष्ट्रीय संकल्पना म्हणजे प्रशासनाच्या आडमुठे धोरणाचा उत्तम नमुना आहे. कारण दर सहा महिन्यांत या सर्कलसाठी टेंडर काढले जाते. तोडून पुन्हा बांधण्यात येते. त्यामुळे सर्कल वाहतुकीसाठी आहे की, कंत्राटदार व अधिकाºयांसाठी तयार करण्यात आलेली कमाईची साधने आहेत, असा प्रश्न न पडलेलाच बरा!
हिंजवडीत स्वयंघोषित पुढा-यांमुळे कोंडी, नो पार्किंगमध्येच पार्किंग, तीनही चौकांमध्ये वाजले वाहतुकीचे तीन तेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 2:29 AM