- देवराम भेगडे
किवळे (पुणे) : यंदा अधिक श्रावण महिना आल्याने दिवाळीसह लग्न मुहूर्तही लांबल्याचे दिसत आहे. आपल्याकडे विवाह मुहूर्त पाहून विवाह करण्याची पद्धत रूढ आहे. ज्या परिवारातील विवाहेच्छूंचा विवाह करण्याचा विचार आहे, त्यांना यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपासून पुढील वर्षातील जुलै महिन्यापर्यंत एकूण ६६ मुहूर्त उपलब्ध आहेत.
अधिक मासामुळे मुहूर्त लांबले
यावर्षी १८ जुलै २०२३ ते १६ ऑगस्ट २०२३ यादरम्यान अधिक श्रावण महिना आला होता. परिणामी, दिवाळी सण एक महिना लांबला असून, तुळशी विवाहानंतर सुरू होणाऱ्या मुहूर्तांवरील विवाह यंदा एक महिना उशिरा सुरू होत आहेत.
२७ नोव्हेंबरपासून जुलैपर्यंत आहेत ६६ मुहूर्त
यावर्षी नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ दरम्यान पंचांगानुसार एकूण ६६ विवाह मुहूर्त आहेत. गेल्या वर्षापेक्षा यंदा ८ अधिक मुहूर्त आहेत. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातील मुहूर्त साधण्यासाठी मंगल कार्यालय नोंदणीसाठी लगबग दिसत आहे.
महिना : मुहूर्त
नोव्हेंबर २०२३ : ३
डिसेंबर २०२३ : १०
जानेवारी २०२४ : १२
फेब्रुवारी २०२४ : १३
मार्च २०२४ : ८
एप्रिल : १०
मे : २
जून : २
जुलै : ६
३ मेपासून २८ जूनपर्यंत नाही मुहूर्त
वैशाख महिन्यात गुरू व शुक्र अस्त असल्याने साधारण मे महिन्यात, तसेच जून महिन्यात अवघे चारच मुहूर्त आहेत. मे महिन्यात दि. १ व २ मे, तर जून महिन्यात दि.२९ व ३० जून, असे मुहूर्त आहेत. वैशाख महिन्यात मुहूर्त नसल्याने काहींचा हिरमोड झाला आहे.
या वर्षात अधिक श्रावण महिना होता. अधिक मासामुळे विवाह मुहूर्त लांबले आहेत. २७ नोव्हेंबरपासून जुलैपर्यंत ६६ मुहूर्त आहेत. काही यजमान मंगल कार्यालय उपलब्ध असल्यास शुभ दिवस पाहून विवाह करण्याबाबत आग्रही असतात.
-पं. प्रशांत बदामी, ज्योतिष, किन्हई