पिंपरी : महापालिकेच्या २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी शहराच्या विविध भागात रस्ते खोदाई करण्यात आली आहे. पावसाळा सुरू झाला तरी हे रस्ते खोदाईचे काम सुरूच आहे. ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे काम रेंगाळले असून, प्रशासनाने अत्यावश्यक काम म्हणून १५ दिवसांची मुदत दिली आहे. मात्र, खोदाईमुळे अपघातामध्ये वाढ झाली आहे. भर पावसाळ्यात रस्ते खोदाईस परवानगी कशी दिली, असा संतप्त सवाल स्थायी समितीतील राष्ट्रवादीचे सदस्य राजू मिसाळ व शिवसेनेचे अमित गावडे यांनी केला. पावसाळ्यात तातडीने काम थांबवा अन्यथा अपघाताची जबाबदारी घेण्याची मागणी करीत प्रशासनाला धारेवर धरले.पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची बैठक आज (बुधवारी) झाली. पावसाळा सुरू झाला तरी आकुर्डी व निगडी प्राधिकरणात रस्ते खोदाई सुरू असल्याने राजू मिसाळ व अमित गावडे यांनी प्रशासनाला फैलावर घेतले. मिसाळ म्हणाले, की शहराच्या विविध भागात २४ तास पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली खोदाईकरून ठेवली आहे. आता पावसाळ्यात कामे करणे शक्यनाही. त्यामुळे कामे चांगल्या दर्जाची होणार नाहीत. शिवाय खड्ड्यांत पाणी साचून अपघाताचा धोका आहे. त्यामुळे तातडीने खड्डे बुजविण्यास सुरुवात करावी.प्राधिकरणातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाण्याचे नियोजन केले जात नाही.तसेच प्राधिकरणात मोठ्या प्रमाणात झाडे आहेत.आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, की अमृत योजनेंतर्गत २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. विशेष योजनेचे काम असल्यामुळे खोदाईस परवानगी देण्यात आली आहे. १५ दिवसांत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिलेल्या मुदतीत खोदाईची कामे पूर्ण न केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.- श्रावण हर्डीकर, आयुक्त
पावसाळ्यात खोदाईस परवानगी; विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी घेतला आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 2:44 AM