पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मागच्या काळात विकासाची घडी बिघडली- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 08:58 PM2023-10-20T20:58:09+5:302023-10-20T21:00:43+5:30

निविदा ‘मॅनेज’ करून किमती वाढविल्या....

During the previous period of the Municipal Corporation, the time of development deteriorated - Ajit Pawar | पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मागच्या काळात विकासाची घडी बिघडली- अजित पवार

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मागच्या काळात विकासाची घडी बिघडली- अजित पवार

पिंपरी :पिंपरी-चिंचवडमधील मागच्या काळात थांबलेल्या विकासाला गती द्यायची आहे. गेल्या काही दिवसात शहराच्या विकासाची बिघडलेली घडी पुन्हा बसवायची आहे. शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे, अशी अप्रत्यक्ष टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी भाजपवर केली.

आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात राष्ट्रवादीतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिलाध्यक्षा कविता आल्हाट, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शेट्टी, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, राजेंद्र जगताप, धनंजय भालेकर, पंकज भालेकर आदी उपस्थित होते.

निविदा ‘मॅनेज’ करून किमती वाढविल्या

पवार म्हणाले, महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना शहराचा नियोजनबद्ध विकास केला. सर्वात श्रीमंत महापालिका असा लौकिक होता. तो आता आपल्याला परत मिळवायचा आहे. त्यासाठी सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. विकासकामांच्या निविदा ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न केला जातो. रिंग केली जाते. किमती वाढविल्या जातात. कररूपाने आलेला पैसा चुकीच्या पद्धतीने खर्च करण्याची उदाहरणे पाहायला मिळतात. थांबलेल्या विकासाला गती द्यायची आहे. रखडलेल्या कामांना गती देऊ.

रोहित पवार यांना टोला

अजित पवार यांनी पुतणे आमदार रोहित पवार यांना टोला लगावला. ते म्हणाले, आता काहीजण अधूनमधून शहरात येत आहेत. वेगळ्या प्रकारचे वातावरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून जनतेने मला, पक्षाला मोठी ताकद, प्रेम दिले. शहरावर माझे विशेष प्रेम आहे. त्यामुळे नेहमीच आपुलकी, प्रेम, जिव्हाळा वाटत असतो. शहराचा विकास व्हावा, यासाठी प्रामाणिक प्रयत्न चाललेला असतो. १५ दिवसांपासून कामांना गती देण्याचा प्रयत्न करत आहे. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी लक्ष घातले. कठोर निर्णय घेतले. रस्ते, पूल, पाणी योजना, शैक्षणिक सुविधा देत असताना शहराचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले. १९९२ पासून २०१७ पर्यंत महापालिका ताब्यात असेपर्यंत सर्वांगीण विकासकामे केली आहेत.

Web Title: During the previous period of the Municipal Corporation, the time of development deteriorated - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.