पिंपरी : दिघी येथील वडमुखवाडी परिसरात २ वर्षांच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. शुभांश गौरव तिवारी (रा. साईनाथ मंदिरजवळ, दिघी) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.शुभांश सकाळी नऊ वाजता नाश्ता करून खेळण्यासाठी घराबाहेर पडला. दुपारी एक वाजले तरी तो घरी परत आला नाही. आजूबाजूला तो खेळत असल्याचा आवाज येत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. आजूबाजूचा परिसर, सोसायटीच्या आवारात सर्वत्र त्याचा शोध घेतला असता, शुभांश शेजारीच असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत पडल्याचे निदर्शनास आले. टाकीतून बाहेर काढल्यानंतर त्याला तातडीने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात नेले. वायसीएमच्या डॉक्टरांनी शुभांश मृत झाला असल्याचे घोषित केले. दोन वर्षांचा चिमुकला दगावल्याने त्याच्या कुटुंबीयांनी अक्रोश केला.मोशी, दिघी परिसरात यापूर्वीही अशाच घटना घडल्या आहेत. बांधकाम साईटवर काम करणाºया मजुराचा मुलगा बांधकामासाठी खोदकाम करून ठेवलेल्या खड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना याच परिसरात घडली होती.
इमारतीच्या पाण्याच्या टाकीत बुडून मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:43 AM