पुणे : मतदान यंत्राद्वारे दिलेले मत योग्य व्यक्तीला दिले की नाही हे समजण्यासाठी मतदानानंतर सात सेकंद संबंधित उमेदवाराचे नाव, अनुक्रमांक आणि चिन्ह मतदान यंत्रावरील स्लिपवर दिसणार आहे. त्यामुळे मतदाराची खात्री पटणार असली, तरी प्रत्येक मतदार सात सेकंद अधिक वेळ घेणार आहे. त्यामुळे मतदानाला पूर्वीपेक्षा अधिक वेळ लागेल.मतदान यंत्र हॅक होऊ शकते, यंत्रावरील कोणत्याही उमेदवारा समोरील बटण दाबल्यास ठराविक पक्षास मत जाते अशी शंकादेखील उपस्थित करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या यंत्रात मतदान कोणाला दिले गेले, हे समजण्याची सुविधा देण्यात आली आहे. मतदारांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राची माहिती देण्यासाठी आणि निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने शनिवारी राजकीय प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावली होती.अप्पर जिल्हाधिकारी डॉ. ज्योत्स्ना पडियार यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. मतदान यंत्रावर मतदान केल्यानंतर त्याला जोडलेल्या व्हीव्हीपॅट यंत्रावर सात सेकंदांसाठी संबंधित उमेदवाराचे नाव, अनुक्रमांक आणि चिन्ह स्लिपवर दिसेल. त्यानंतर संबंधित स्लिप व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये जाईल. या मुळे मतदाराला आपण केलेले मतदान योग्य व्यक्ती आणि चिन्हावरच गेले असल्याची खात्री पटेल. निवडणूक कामकाजाची माहिती देताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह म्हणाल्या, जिल्ह्याला ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्र प्राप्त झाले असून, भोसरी येथील गोदामात त्यांची प्राथमिक तपासणी सुरु आहे.जिल्ह्यात ३१ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार २ लाख ८८८ मतदारांची नव्याने नोंदणी झाली आहे. त्यानंतर राबविण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांची संख्या पाहता आणखी १६१ मतदान केंद्रांची संख्या वाढणार आहे. दिव्यांग मतदारांची नावे तळमजल्यावर अथवा पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रातच राहतील याची दक्षता घेण्यात येत आहे.
प्रत्येक मतदानाची वेळ वाढणार सात सेकंदांनी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 3:09 AM