लोणावळा : लोणावळ्याजवळील वेहेरगावच्या गडावर स्थानापन्न असलेल्या कुलस्वामिनी एकवीरा देवीच्या चैत्र यात्रेकरिता राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावे याकरिता श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्वतोपरी तयारी करण्यात येणार असल्याचे आश्वासन ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार अनंत तरे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी बोलाविलेल्या आढावा बैठकीत दिले. यात्रा शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राव यांनी केले. शासकीय सर्व यंत्रणा यात्राकाळात भाविकांच्या सुविधेसाठी गडावर व परिसरात सज्ज असेल, असेही त्यांनी सांगितले. गडावर येण्या-जाण्यासाठीच्या पायऱ्या लहान असल्याने काही ठिकाणी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त नेमणे, वाहनांना बाहेर जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे, गडावर मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी, तीन दिवस अखंडित वीजपुरवठा, परिसरातील जलस्रोतांचे शुद्धीकरण, गड, पायथा व पार्किंग येथे वैद्यकीय सुविधा, मंदिरात भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी विशेष व्यवस्था, दर्शनबारीमध्ये क्लोज सर्किटच्या माध्यमातून टीव्हीवर मंदिर गाभाऱ्याचे दर्शन आदींवर बैठकीत चर्चा करून सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.संपर्कासाठी मध्यवर्ती ठिकाणी सेंट्रल डेस्क तयार करण्यात येणार असून, त्या ठिकाणी सर्व विभागांचे प्रमुख अथवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील, अशी सोय करण्यात येईल. यात्रेदरम्यान वेहेरगावसह परिसरात दारुबंदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.बैठकीला पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक, प्रांत सुभाष बगाडे, तहसीलदार जोगेंद्र कटयारे, ट्रस्टचे अध्यक्ष तरे, लोणावळा पोलीस उपअधीक्षक डी. डी. शिवथरे, लोणावळा ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील, उपाध्यक्ष मदन भोई, सचिव संजय गोविलकर, खजिनदार नवनाथ देशमुख, काळुराम देशमुख, विलास कुटे, विजय देशमुख यांच्यासह पालखीचे मानकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
भाविकांना सुलभ दर्शन, सुविधांना प्राधान्य
By admin | Published: March 24, 2017 4:09 AM