पिंपरी : चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने ज्या त्या हंगामात पिकणारी फळे खायलाच हवी. सध्या पेरूचा हंगाम आहे. पेरूतील जीवनसत्त्व क आणि इतर पौष्टिक घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, तसेच शरीर सुदृढ व मजबूत होते. पेरू पाचक आणि नैसर्गिक रेचक म्हणून उत्तम कार्य करतो. थंडीत पेरू खाल्ल्याने मधुमेही रुग्णास फायदा होतो.
बाजारात विविध प्रकारचे पेरू
बाजारात पेरू विविध आकार, प्रकारात मिळतात. सामान्यपणे पेरूच्या दोन जाती आहेत. एका जातीमध्ये पांढरा, तर दुसया जातीमध्ये गुलाबी गर असतो. दोन्हीही जातीचे पेरू चवीने गोड व थोडेसे तुरट असतात. आवळ्याच्या खालोखाल भरपूर प्रमाणात क जीवनसत्त्व देणारे फळ म्हणून पेरू ओळखला जातो.
पेरूचा दर ४० रुपये
पेरूमध्ये क जीवनसत्त्व असून, हे फळ बुद्धिवर्धक आहे. पेरू सेवनाने मानसिक थकवा दूर होऊन ऊर्जा प्राप्त होते. हिवाळ्यात पेरू हा ४० ते ५० रुपये किलोने मिळतो. त्यामुळे हे फळ कुणाही सर्वसामान्य नागरिकांना सहज उपलब्ध होऊ शकते.
थंडीत पेरू आरोग्यासाठी लाभदायक
पेरू हे अत्यंत स्वस्त, पण आरोग्यासाठी फायदेशीर फळ आहे. पेरूमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच जीआय असतो, ज्यामुळे साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फोलेट, पोटॅशियम यांसारखे पोषक घटक आढळतात. पेरू हे मधुमेह आणि हृदयाच्या रुग्णांसाठी खूप चांगले फळ आहे.
नियमित पेरू खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होत नाही. थंडीच्या बहरातील पेरू खाल्ल्यास रक्तातील साखर अर्थात ब्लडशुगर नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. तसेच बद्धकोष्ठतेच्या समस्येवर सकाळच्या वेळी उपाशीपोटी पिकलेला पेरू खाणे फायद्याचे ठरत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
रोगप्रतिकारशक्तीत वाढ
पेरू खाल्ल्यामुळे त्यातील जीवनसत्त्व ‘अ’ च्या माध्यमातून डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. पेरूच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडंटसह इतर पौष्टिक घटकांचा समावेश असतो. लहान मुले, अशक्त स्त्रिया, कृश व्यक्ती यांनी पेरूचे नियमित सेवन करावे.