पिंपरी - इनफोर्समेंट डायरेक्टोरेट डिपार्टमेंट (ई.डी.) ने जप्त २०१३ मध्ये जप्त केलेल्या जमिनीची बेकायदा विक्री केली केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या खरेदी विक्री व्यवहाराची नोंदणी करणा-या मुळशी व पौड येथील दुय्यम निबंधक तसेच बांधकाम व्यावसायिकांसह आठ जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात ईडीने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सय्यद मोहम्मद मसुद, साजीद इब्राहिम वारेकर, गुड्डू शेख, प्रवीण रामचंद्र गुरव, साहिल रिअॅल्टी, हिंदवी स्वराज्य ट्रेडींग प्रा.लि., मुळशी- २ दुय्यम निबंधक कार्यालय, पौड दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिकारी यांच्या विरोधात फसवणुकीचा तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ईडीने गुन्हा दाखल केला आहे. ईडीने १५ जुलै २०१३ मध्ये सर्व्हे क्रमांक २२० हिस्सा क्रमांक १ व ५/५ ता. मुळशी येथे ०.८३ हेक्टर ही मिळकत जप्त केली होती. ही मिळकत इडीने जप्त केली आहे, याबद्दल माहिती असूनही सय्यद मसूद याने ती जमीन साजिद इब्राहिम वारेकर, गुड्डू शेख, प्रवीण रामचंद्र गुरव, साहिल रिअॅल्टर्स, हिंदवी स्वराज्य ट्रेडींग प्रा.लि.यांना विकली. यासाठी दुय्यम निबंधकांशी संगनमत केले. दोनवेळा या जमिनीची निबंधक कार्यालयाच्या रजिस्टरवर नोंद केली. ही जमीन ईडीची आहे माहिती असून सुद्धा हिंदवी स्वराज्य ट्रेडींग प्रा.लि. चे संचालक प्रवीण गुरव यांनी तेथे उत्कर्ष हा गृहप्रकल्प बांधला. या गृहप्रकल्पात आयटी क्षेत्रात काम करणाºया अनेकांनी सदनिका खरेदी केल्या. आता जमिन खरेदी करून गृहप्रकल्प उभारणाºयांबरोबर ज्यांनी सदनिका खरेदी केल्या आहेत, तेसुद्धा संकटात सापडले आहेत. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात फसवणूक तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चतु:श्रृंगी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विक्रम पाटील करीत आहेत.