पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ सभापती आणि उपसभापती निवडणूक ८ आॅक्टोबरला जाहीर झाली आहे. नामनिर्देशनपत्राचे वाटप मंगळवारी असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आजच अर्ज दाखल झाले आहेत. त्यात सभापतिपदासाठी सहा जण इच्छुक असून, केवळ एकच जण उपसभापतिपदास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बंडखोरी होण्याची चिन्हे दिसत असून काही सदस्य नॉट रिचेबल झाले आहे.विद्यमान सभापती धनंजय भालेकर, उपसभापती श्याम आगरवाल यांनी राजीनामा दिला असल्याने या दोन पदांसाठी गुरुवारी निवडणूक होणार आहे. महापालिका शिक्षण मंडळात लोकनियुक्त १०, शासननियुक्त दोन असे एकूण १२ सदस्य आहेत. त्यात राष्ट्रवादीचे विजय लोखंडे, लता ओव्हाळ, धनंजय भालेकर, फजल शेख, नाना शिवले, शिरीष जाधव, चेतन भुजबळ, चेतन घुले, सविता खुळे, निवृत्ती शिंदे, काँग्रेसचे विष्णू नेवाळे आणि श्याम आगरवाल यांचा समावेश आहे. त्यांपैकी पहिल्या वर्षी विजय लोखंडे यांना सभापती आणि लता ओव्हाळ यांना उपसभापतिपदी संधी मिळाली. त्यानंतर फजल शेख आणि सविता खुळे यांना संधी मिळाली. शेख आणि खुळे यांचे राजीनाम्याचे नाट्यही काही महिने रंगले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाने उठाव केल्याने निवडणूक झाली आणि भालेकर आणि आगरवाल यांना संधी मिळाली. इतरांना संधी मिळावी म्हणून त्यांनी सहा महिन्यांतच राजीनामा दिला आहे. नामनिर्देशनपत्र दाखल होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिकेतील पक्षनेत्या मंगला कदम यांनी इच्छुकांना अर्ज दाखल करण्यातचे आवाहन केले होते. त्यापैकी या पदासाठी माजी उपसभापती सविता खुळे, शिरीष जाधव, नाना शिवले, चेतन भुजबळ, चेतन घुले, विठ्ठल शिंदे यांनी, तर उपसभापतिपदासाठी माजी उपसभापती लता ओव्हाळ या एकट्याच इच्छुक आहेत. सभापती होण्यासाठी सहा जण इच्छुक आहेत. पक्षनेत्यांवर दबाव टाकण्याचे तंत्र पद न मिळालेल्या सदस्यांनी अवलंबले आहे. त्यामुळे सभापतिपदाचा कालावधी एक वर्ष की सहा महिने द्यायचा, असा निर्णय पक्षनेत्यांना घ्यावा लागणार आहे. दबाव टाकणाऱ्या एका गटाच्या सदस्यांचे मोबाईल स्विच आॅफ आहेत. (प्रतिनिधी)गटबाजीचे आव्हान-सभापतिपदासाठीच इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मनधरणी करण्याचे मोठे आव्हान पक्षनेत्यांसमोर आहे. यामध्ये माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, आमदार लक्ष्मण जगताप समर्थकांची संख्या अधिक आहे. जगतापांनी भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्या समर्थकांना कितपत स्थान दिले जाणार हाही प्रश्न आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील उर्वरित कोणत्या गटाला झुकते माप दिले जाणार याबाबत चर्चा आहे. नेते अजित पवार कोणती भूमिका घेतात, कोणाचे नाव सुचवितात याकडे लक्ष लागले आहे.
शिक्षण मंडळ सदस्य नॉट रिचेबल
By admin | Published: October 07, 2015 4:16 AM