लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : बारामती शहरातील अनुदानित शाळांनी विद्यार्थ्यांकडून आकारलेली फी परत करण्याचे आदेश गटशिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत. मागील तीन वर्षांची फी (शुल्क) परत करावे, असे या शाळांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे. या संदर्भात गटशिक्षणाधिकारी किशोर पवार यांनी आदेश दिले आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची निर्मला हरिभाऊ देशपांडे शाळा, कविवर्य मोरोपंत शिक्षण संस्थेचा प्राथमिक विभाग व महात्मा गांधी बालक मंदिर या तीन शाळांना गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये आता विद्यार्थ्यांकडून घेतलेली फी परत करावी लागणार आहे.शहरातील या शाळा अनुदानित असतानाही विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी मोठी फी आकारत असल्याचे माहिती अधिकारातून येथील फैय्याज शेख यांनी उघड केले होते. या संदर्भात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. शाळा प्रवेशासाठी शुल्क आकारणी केली जात नाही, असे स्पष्टीकरण एका शाळाने लेखी दिले होते. परंतु, प्रवेशाच्या नावाखाली सांस्कृतिक कार्यक्रम व अन्य शीर्षकांच्या नावाखाली शुल्क आकारणी करून पालकांना पावत्या दिल्या जात होते. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी २० ते २५ हजार शुल्क आकारणी कशी केली जाते, इतक्या पैशातून काय केले जाते, याची विचारणा देखील त्यांनी केली. सक्तीचे शिक्षण अधिनियम लागू आहे. त्यानुसार कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेपासून वंचित ठेवू नये, असे आदेश आहे. काही शाळा शंभर वर्षांची परंपरा असताना देखील कायदेची पायमल्ली करीत आहेत. आर्थिक, दुर्बल, वंचित घटकांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवणे आवश्यक असताना देखील त्याची अंमलबजावणी होत नाही. या पार्श्वभूमीवर शेख यांनी तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत गटशिक्षणाधिकारी किशोर पवार यांनी या तीन शाळांना, आपली शाळा अनुदानित असूनही आपण विद्यार्थ्यांकडून फी घेत आहात ही गंभीर बाब आहे. अशा प्रकारे आपणास कोणतीही फी घेता येणार नाही. आपण घेतलेली मागील तीन वर्षांची फी संबंधित विद्यार्थ्यांना परत करावी, असा आदेश दिला आहे. या शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी ही फी परत घेण्यासाठी शाळांशी संपर्क साधावा, असे आवाहन शेख यांनी केले आहे.
तीन शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांचा दणका
By admin | Published: June 02, 2017 1:52 AM