पिंपरी : लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त घराबाहेर पडत असतानाच गुरुवारी पावसाने पिंपरीत जोरदार हजेरी लागली. पावसाच्या या सलामीनंतर घाटावर तसेच विसर्जन हौदांच्या परिसरात भक्तीचा महापूर आला. गणेशभक्तांनी मूर्ती विसर्जनासाठी मोठी गर्दी केली. पिंपरी येथील शगुन चौकातील मिरवणूक दुपारी साडेतीनला सुरू झाली. रात्री बारा वाजतापर्यंत वाजतगाजत मिरवणूक सुरू होती. त्यानंतर पहाटेपर्यंत हौदांमध्ये विसर्जन सुरू होते.
पिंपरी येथील मुख्य मिरवणूक मार्ग असलेल्या शगुन चौकात महापालिकेतर्फे स्वागत कक्ष उभारला होता. त्यासोबतच काँग्रेस तसेच पिंपरी पोलिस ठाण्यातर्फेही कक्ष उभारला होता. या तिनही कक्षांतर्फे मंडळांचे स्वागत केले जात होते. मंडळाच्या अध्यक्षांना श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सन्मानित केले जात होते. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडूनही मोठा जल्लोष करण्यात आला. शगुन चौकात साडेआठ तास वाजतगाजत मिरवणूक सुरू होती. पावसाच्या जोरदार आगमनाने काही मंडळांनी मिरवणूक उशिराने सुरू केली. मात्र, विसर्जन मिरवणुकीत उत्साह होता. पावसाने अधून -मधून शिडकावा केला. त्यामुळे गणेशभक्तांचा उत्साह व्दिगुणीत झाला आणि मिरवणुकीतील रंगत वाढत गेली.
दुपारी साडेतीनला पहिले मंडळ दाखल
शगुन चौकात दुपारी साडेतीनला सदानंद तरुण मित्र मंडळ दाखल झाले. या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जयघोष करून जल्लोष केला. त्यानंतर शिव मित्र मंडळ, जय भारत मित्र मंडळ, जय भीम मित्र मंडळ, त्यानंतर रिव्हर रोड येथील फाइव्ह स्टार तरुण मंडळ चौकात दाखल झाले. त्यांच्याकडूनही पुष्पवर्षाव भंडारा उधळण्यात आला.
‘आमच्या पप्पांनी गणपती आणला...’
मानाचा गणपती, नवसाला पावणारा गणपती, महोत्सवी गणपती असलेल्या अनेक मंडळाच्या मिरवणुकीने रंगत आणली असतानाच शगुन चौकात अष्टविनायक मित्र मंडळाच्या बाल पथकाने लक्ष वेधून घेतले. मंडळाच्या बाल वादकांनी ताशाचे उत्कृष्ट वादन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. बाल गणेश भक्तांनी ढोल ताशांच्या कडकडाटात ठेका धरला. यावेळी त्यांच्यावर पुष्प वर्षाव करण्यात आला. महापालिकेतर्फे या बालमंडळाच्या अध्यक्षाचा सन्मान करण्यात आला. मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करून बाल गणेशभक्तांनी वातावरण निर्मिती केली.
डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई
अमर ज्योत मित्र मंडळ, मयुरेश्वर मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ यांच्यासह अन्य काही मंडळांनी ढोलताशा पथकांसह डीजेच्या दणदणाटात मिरवणूक काढली होती. यात डीजेच्या तालावर तरुण व तरुणीही थिरकल्या. मंत्रमुग्ध होत नृत्य करून बाप्पाचा जयघोष केला.
बॅण्डपथकांनी वेधले लक्ष
वैशाली नगर मित्र मंडळ, बालाजी गणेश मित्र मंडळ, महेश मित्र मंडळ, बालाजी गणेश मित्र मंडळ अशा काही मंडळांनी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली होती. यात बॅण्ड पथक, बॅन्जो पथक देखील होते. ड्रम पथक देखील होते. गणरायाची विविध गाणी सादर करून या पथकांनी लक्ष वेधून घेतले.
मध्यरात्री दणदणाट बंद
दुपारी साडेतीनला सुरू झालेला मिरवणुकीचा दणदणाट रात्री बारावाजता बंद करण्यात आला. शगुन चौकात बालाजी मित्र मंडळ रात्री बारापूर्वी दाखल झाले. या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डीजेवर ठेका धरला. मात्र, बारावाजता डीजे बंद करण्यात आला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक थांबवून पारंपरिक पद्धतीने गणेश मूर्तीचे विसर्जन केले.