रमेश फरताडे - पुणे : जन्मानंतर चालणं, बोलणं यासाठी ठराविक काही महिने- वर्ष तरी लागतातच. जगात जसे प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात तसे याबाबतीत म्हणता येईल. एक अठरा महिन्यांचा अवलिया मुलगा ज्याने मागील काही दिवसांपासून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याची पिंपरी परिसरात ‘गुगल बॉय’ म्हणून ओळख असून तो सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने अठरा महिन्यांच्या कालावधीतच शुभंकरोती, आठवड्यांची नावे, एबीसीडी, महिन्यांची नावे, सर्व रंग, दिशा, श्लोक, दहा ते बारा बडबडगीते आणि त्यावरील कृती अगदी योग्यरित्या ओळखतो. प्रत्यूष बद्रीनारायण पाटील असे या ‘ गुगल बॉय ’ चे नाव आहे. प्रत्युष हा सोमाटणे येथील रहिवासी आहे. प्रत्यूषचे वडील शिरगाव येथील एका खासगी शाळेत शिक्षक आहेत. तर आई उच्चशिक्षित असून गृहिणी आहेत. प्रत्यूष हा नऊ महिन्यांचा झाल्यापासून त्याच्यात असणाऱ्या या विशेष बुद्धिमत्तेचा अनुभव त्याची आई अश्विनी पाटील यांना आला. त्याने पहिल्याच वेळेस गायत्री मंत्र म्हणून दाखवला. काहीच शब्द बोलू न शकणाऱ्या वयात या मुलाने गायत्री मंत्र म्हणून दाखवला म्हणजे यात काहीतरी वेगळं आहे, हे त्यांनी हेरलं आणि त्याला पुढील गोष्टीसाठी तयार करायचा, असं त्यांनी ठरवलं. त्याने काही गाण्यांवरून गायकांची नावे, चित्रावरून काही गाड्यांची, झाडांची नावे, जंगली प्राणी, पाळीव प्राणी, राष्ट्रीय प्राणी, फूल, खेळ, राष्ट्रगीत, फोटोवरून सुमारे ५० नातेवाइकांची नावे आणि विशेष म्हणजे नुसत्या ध्वजावरून ४८ देशांची नावे ओळखतो. भूमितीचे आकार, खेळाचा प्रकार या गोष्टींची माहिती मुखोद्गत आहेत. अवघ्या दीड वर्षाच्या वयात मोठी शब्दसंपदा असणाऱ्या प्रत्यूषची चर्चा होत आहे. त्याच्या गुणाविषयी त्याची आई अश्विनी पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले, त्याच्यात असणाऱ्या गुणांची ओळख मला नवव्या महिन्यांतच झाली होती. त्यामुळे मी त्याचा हा गुण वाढीस लागावा म्हणून प्रयत्न करायला सुरू केले आणि आज आपण त्याची प्रगती पाहतो. जर प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलात विशेष गुण दिसला तर तो हेरून त्याला वाढीस लागण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
अवघ्या अठरा महिन्यांच्या ‘गुगल बॉय’ च्या अफाट बुध्दीमत्तेची धमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 5:14 PM
पिंपरी परिसरात ‘गुगल बॉय’ म्हणून ओळख असून तो सर्वत्र चर्चेचा विषय...
ठळक मुद्देअवघ्या दीड वर्षाच्या वयात मोठी शब्दसंपदा असणाऱ्या प्रत्यूषची चर्चा भूमितीचे आकार, खेळाचा प्रकार या गोष्टींची माहिती मुखोद्गत नुसत्या ध्वजावरून ओळखतो ४८ देशांची नावे