पिंपरी : शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सोमवारी भाजपचे आमदार गोव्यास पोहोचणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. राज्याचे राजकारण सुरत, गुवाहाटीनंतर आता गोव्याभोवती फिरत आहे. सध्या गोव्याच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राचा प्रभार आहे. राजभवनात जाऊन बंडखोर आमदार गोव्याच्या राजभवनात असणार आणि तिथे दावा करू शकतात, असे सूत्रांकडून समजते.
हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेत फूट पडली आहे. राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपासून शिवसेना आमदारांना घेऊन सुरुवातीला सुरतला आणि आता गुवाहाटीमध्ये गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे. तर शिवसेनेच्या बंडामागे कोण? अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुजरातेत भेट झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजपातही हालचाली!
शिवसेनेत घडामोडी होत असताना, दुसरीकडे भाजपातही हालचाली सुरू झाल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. सोमवारी भाजपचे आमदारही गोव्यात दाखल होणार आहेत. त्यांच्या विमानाची तिकिटे आणि नियोजनाची जबाबदारी तीन आमदारांवर सोपविण्यात आली आहे. त्यात आमदार नीतेश राणे, पिंपरी-चिंचवडचे महेश लांडगे आणि राहुल कुल यांचा समावेश आहे, असे समजते.असे होऊ शकते!
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आजारी आहेत, त्यामुळे गोव्याच्या राज्यपालांकडे चार्ज आहे. बंडखोर आमदार सुरत, गुवाहाटीनंतर गोव्यात येऊन राजभवनात जाऊन सत्तास्थापनेचा तिथे दावा करू शकतात. शिवसेना आणि बंडखोर यांच्या गोवा दौऱ्यावरून उलटसुलट चर्चा होत आहे. तर भाजप आमदार गोव्यास का जाणार, कशासाठी जाणार, याबाबत भाजप गोटातून दुजोरा मिळू शकला नाही. अद्याप तरी या फक्त चर्चाच आहेत.