पिंपरी :पुणे शहरातील एक माजी नगरसेवक आणि युवा सेनाचा अधिकारी शिंदे गटात सामील झाल्याचे पडसाद पिंपरी-चिंचवड शहरात उमटले. या माजी नगरसेवकाचा पिंपरी-चिंचवडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धिक्कार केला. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंसोबत असून एकही जण शिंदे गटात जाणार नसल्याची माहिती शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी दिली.
शिंदे गट की ठाकरे गट यावरून राज्यात राजकारण पेटले असताना पिंपरी-चिंचवडमधील शिवसैनिक, माजी नगसेवक हे उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे चित्र आहे. सध्या ‘मातोश्री’वर बैठकांचे सत्र सुरू असून शहरातील पदाधिकारी या बैठकांना हजेरी लावत असून आगामी रणनीती ठरवत आहेत. संपर्कप्रमुखांच्या नेतृत्वाखाली सर्वच पदाधिकारी एकजूट दाखवत आहेत.
‘ती’ केवळ अफवा
नुकतीच पिंपरी-चिंचवडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक शहरातील पक्षकार्यालयात झाली होती. या बैठकीला एक वरिष्ठ महिला पदाधिकारी, शिवसेनेचे पालिकेतील गटनेते अनुपस्थित होते. त्यामुळे दबक्या आवाज उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, गटनेते आणि वरिष्ठ महिला पदाधिकारी या उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे शहरप्रमुख सचिन भोसले यांनी सांगितले. बैठकीवेळी ते शहरात नसल्याने अनुपस्थित होते. मी देखील त्यावेळी वारीत होतो. म्हणून मीसुद्धा बैठकीला गैरहजर होतो. मात्र, मी तसे संपर्कप्रमुखांना कळवले होते. त्यामुळे पदाधिकारी नाराज असल्याची केवळ अफवा आहे, असे भोसले यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे स्वागतच
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आगामी निवडणुका शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून लढवाव्यात, असे वक्तव्य केले होते. महाविकास आघाडीला पिंपरी-चिंचवडमधील शिवसैनिकांचा पाठिंबा आहे. मात्र, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो अंतिम असेल, असे सचिन भोसले म्हणाले.
संघटना मजबूत करणाऱ्यावर भर
आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून शहरातील संघटना मजबूत करणाऱ्यावर भर दिला जातो आहे. शिवसंपर्क अभियानानंतर बुथप्रमुख नेमण्यात आलेले आहेत. सदस्य नोंदणी मोहीमदेखील सुरू आहे. आगामी पालिका निवडणुकीत शहरातील शिवसेनेची ताकद दाखवून देऊ, असा विश्वास पदाधिकारी व्यक्त करत आहेत.