पिंपरी : श्रद्धेला ठेच पोहोचून विकास करणारे राजकर्ते आपण नाही. सर्वांना एकत्र घेऊन जाणारे राजकर्ते आहोत. जगात सर्वांत मोठे संत तुकाराम महाराजांचे मंदिर भंडारा डोंगरावर होत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि येथील मंदिर एकच कलावंत बांधत आहेत. तिकडे श्रीराम मंदिर इकडे संत तुकाराम महाराज मंदिर उभारले जात आहे. येथील तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा तयार करा. आपण सगळे मिळून मंदिर उभारू, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडारा डोंगर येथे व्यक्त केले.
भंडारा डोंगरावर श्री भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने दशमी सोहळा सुरू आहे. त्यात मुख्यमंत्री सहभागी झाले. मंदिराची पाहणी केली. तसेच सूचनाही केल्या. या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, आमदार भरत गोगावले, शरद शिरसाट, माजी आमदार बाळा भेगडे, विलास लांडे, विजय बोत्रे, गजानन शेलार आदी उपस्थित होते. यावेळी तुकोबांची पगडी देऊन मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मी आज भंडारा डोंगरावर वारकऱ्यांना भेटायला आलो आहे. हे सरकार वारकऱ्यांचे आहे. मोठी ताकद वारकऱ्यांमध्ये आहे. तुकोबारायांच्या दर्शनासाठी छत्रपती शिवराय आले होते. अशी ही पवित्र भूमी आहे. वारकरी संप्रदाय आपली मोठी ताकद आहे. आगळ्यावेगळ्या ऊर्जेने भरलेले तीर्थक्षेत्र आहे. पांडुरंग भक्तीने अनेकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. तीर्थक्षेत्रांतून भक्ती, श्रद्धा, मांगल्य, प्रेरणा मिळत असते. महाराष्ट्राला थोरसंतांची परंपरा लाभली आहे. विविध भागात भव्य मंदिर उभी राहायला हवीत.’
एकत्रित विकास आराखडा तयार करू
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या डोंगर फोडून येथून रिंगरोड जात आहे. याबाबत मला माहिती दिली. खरे तर, रस्ते, रिंग रोड शहराची गरज असते. मात्र, भंडारा डोंगराला धक्का न लावता, हा रस्ता वळविला. विकास हा लोकांसाठीच करतो. जगात सर्वांत मोठे तुकोबारायांचे मंदिर असणार आहेत. तिकडे श्रीराम मंदिर इकडे संत तुकाराम महाराज मंदिर. प्रामाणिकता तळमळ, श्रद्धाभक्ती,भाव असावा लागतो. त्यातून महान कार्य होत असते. यंदा मी आषाढीला पंढरपूरला गेलो होतो. पूजेचे भाग्य मला भाग्य लाभले.