कार्ला : येथील एकवीरा देवीच्या मंदिरावरील कळस चोरीच्या घटनेला ३ आॅक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. गाववाले व एकवीरा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष अनंत तरे यांच्यात कळसाची चोरी झाल्या दिवसापासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. रास्ता रोको आंदोलन, गडावर महाआरती, बैठकांतूनही समर्थकांची गर्दी करून आपली ताकत दाखविण्याचा दोन्ही बाजूंकडून प्रयत्न झाला. या देवस्थानच्या ट्रस्टवर आपले वर्चस्व दाखविण्यासाठी दोन्ही गटांकडून चढाओढ सुरू आहे.
दोन्ही बाजूच्या विश्वस्तांच्या गटामध्ये समझोता व्हावा म्हणून कोल्हापूर परिमंडलचे विशेष पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी स्वत: बैठक घेऊन प्रयत्न केला. तसेच धर्मादाय आयुक्तांनीही दोन्ही बाजू विचारात घेऊन दोन्हीकडील एकेका विश्वस्ताला सह्यांचा अधिकार दिला. एवढे सगळे प्रयत्न दोन्ही बाजूकडील वाद मिटावा म्हणून अनेकांनी केले असताना, दोन्ही बाजूंच्या ताठर भूमिकेमुळे हा वाद गेल्या वर्षभरात वाढत गेला आहे. अलीकडे न्यायालयाने प्रशासकाच्या माध्यमातून येथून पुढे ट्रस्टचा कारभार करण्याचा निर्णय दिला. आता प्रश्न निर्माण होतो एकवीरा ट्रस्टवर न्यायालयाने प्रशासक नेमलेले असताना, न्यायालयाचा अवमान होणार नाही असेच वर्तन दोन्ही गटाकडून होणे अपेक्षित आहे. रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था आहे. पुणे - मुंबई हाकेच्या अंतरावर असताना आणि येथील भाविक वर्षभरातून दोन-तीन वेळा तरी आई एकवीरेच्या दर्शनासाठी येतात. येथील विकासकामेही व्हावीत, अशी भाविकभक्तांची अपेक्षा आहे.ट्रस्टच्या माध्यमातून भाविकभक्तांसाठी गडावर विकास करण्याऐवजी आपले वर्चस्व दाखवायचा प्रयत्न काही जणांकडून होत असल्याचे या वर्षभरात दिसून आल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. हे सर्व थांबविण्यासाठी प्रशासनाने बोटचेपी भूमिका न घेता कडक भूमिका घेऊन दोन्ही बाजूंच्या गटांना कडक समज देऊन भाविक-भक्तांचा मनातील विकास साधण्याचा प्रयत्न केला पाहीजे. या वादामुळे येथील विकासकामे मंदावली आहेत.