लोणावळा : लोणावळ्याजवळील वेहेरगाव गडावरील कुलस्वामिनी एकवीरादेवीच्या मंदिरावरील सोन्याचा मुलामा दिलेल्या पंचधातूच्या कळसाची चोरी झाली आहे़ ही घटना सोमवारी रात्री तीनच्या सुमारास घडली. या घटनेच्या निषेधार्थ वेहेरगाव ग्रामस्थांनी मंगळवारी बंद पाळला.तीन वर्षांपूर्वी एका भाविकाने सोन्याचा मुलामा असलेला पंचधातूचा कळस अर्पण केला होता. दोन दिवसांपूर्वी देवीची नवरात्र यात्रा व महानवमी होम झाला होता. मंगळवारी ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या कळसावर सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत़ तसेच चार पोलीस कर्मचारी व देवस्थानचे दोन कर्मचारी रात्री तैनात असताना झालेली ही चोरी म्हणजे सुरक्षेचे धिंडवडे काढण्याचा प्रकार आहे.घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिक, वेहेरगाव ग्रामस्थ, देवस्थानचे विश्वस्त आणि मंदिराचे गुरव मंदिरात पोहोचले. त्यानंतर लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, लोणावळा ग्रामीणच्या सहायक पोलीस निरीक्षक साधना पाटील आणि पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेज हक, अपर पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, मावळचे तहसीलदार रणजित पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुणे ग्रामीणचे श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञ यांची या तपासाकामी मदत घेण्यात आली असून, मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजही तपासले जात आहे. लवकरच या चोरीमधील आरोपींचा छडा लावला जाईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. दुसरीकडे या घटनेच्या निषेधार्थ एकवीरा गडावरील सर्व व्यवसाय ग्रामस्थांकडून बंद ठेवण्यात आले.
एकविरा देवीच्या मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 7:05 AM