पिंपरी : दुकानात जातो, असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या वृद्ध व्यावसायिकाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली. भिशी मेंबरला वैतागून जीवन संपवत आहे, मी आत्महत्या करत आहे, असे त्यात नमूद केले आहे. ओतूर (जि. पुणे) येथे सोमवारी (दि. १६) दुपारी दीडच्या सुमारास आत्महत्येची ही घटना उघडकीस आली.
कमरुद्दीन गुलामुद्दीन मुलाणी (वय ७४, रा. निगडी प्राधिकरण), असे आत्महत्या केलेल्या वृद्ध व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमरुद्दीन मुलाणी यांचे भोसरी येथे वाहनांच्या बॅटऱ्या विक्रीचा व्यवसाय आहे. ते नेहमीप्रमाणे निगडी येथून त्यांच्या घरातून रविवारी सकाळी दुकानात जाण्यासाठी निघाले. मी दुकानात जातो, असे त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितले. त्यानंतर घराबाहेर पडले. सायंकाळी ते घरी न परतल्याने घरच्यांनी दुकानातील मुलाला फोन केला. वडील दुकानातून घरी जाण्यासाठी किती वाजता निघाले, असे कमरुद्दीन मुलाणी यांच्या मुलांनी विचारले. वडील आज दुकानात आलेच नाहीत. त्यांचा दुपारी दीडला फोन आला होता. मी आळेफाटा येथे नातेवाईकांकडे जात आहे. रात्री साडेदहापर्यंत परत येईल, असे त्यांनी फोनवरून सांगितल्याचे दुकानातील मुलगा म्हणाला. त्यानुसार कमरुद्दीन यांच्या घरच्यांनी आळेफाटा येथील नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र ते तेथेही मिळून आले नाहीत. त्यामुळे घरच्यांनी निगडी पोलिसांकडे धाव घेत कमरुद्दीन हे बेपत्ता झाल्याची सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास नोंद केली.
दरम्यान कमरुद्दीन यांच्याकडे फोन असल्याने त्याच्यावर सातत्याने संपर्क साधण्यात येत होता. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या कार्यालयातील अधकारी व कर्मचारी तसेच आयुक्तालयाच्या सायबर सेलकडून त्यांचा तांत्रिकदृष्ट्या शोध सुरू झाला. ते ओतूर येथे असल्याचे सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास निष्पन्न झाले. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कमरुद्दीन यांच्या कुटुंबियांना माहिती दिली. कुटुंबियांनी तत्काळ ओतूर येथे धाव घेतली. तसेच काही नातेवाईक व स्थानिकांच्या मदतीने कमरुद्दीन यांचा शोध घेतला असता तेथील धरणाच्या बॅक वाटर परिसरात त्यांचे कपडे मिळून आले. त्यामुळे पाण्यात शोध घेतला असता दुपारी दीडच्या सुमारास त्यांचा मृतदेह मिळून आला.
कमरुद्दीन यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. अभियंता अन्वर मुलाणी, आणि आकुर्डी येथील व्यावसायिक अशपाक मुलाणी यांचे ते वडील होत.
भिशी मेंबरला वैतागून आत्महत्याकमरुद्दीन यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली. भिशी मेंबरने पैसे भरले नाहीत. ते पैसे मी भरले. मात्र त्यांनी ते पैसे मला परत केले नाहीत. भिशी मेंबरला वैतागून जीवन संपवत आहे, मी आत्महत्या करीत आहे, ओतूर गाव पुलाजवळ, वेळ संध्याकाळी सात वाजता, असे चिठ्ठीत लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले.