- नारायण बडगुजर
पिंपरी - चार किलो वजनाच्या गॅस सिलेंडरचा स्पोर्ट होऊन ७० वर्षीय वृद्ध जखमी झाला. तसेच खोलीच्या छताचे पत्रे उडून घरगुती साहित्याचे नुकसान झाले. पिंपरी येथील संत तुकाराम नगरमध्ये शनिवारी (दि. २१) रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
चंद्रकांत शिवलिंग कांबळे (७०, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. संत तुकाराम नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत कांबळे यांचे एक नातेवाईक संत तुकाराम नगर येथे राहण्यास आहेत. या नातेवाईकाच्या घराच्या टेरेसवरील एका खोलीत कांबळे आणि त्यांचा भाऊ राहतात. कांबळे यांचा भाऊ शनिवारी सायंकाळी बाहेर गेले असता कांबळे खोलीत एकटे होते. त्यावेळी चार किलो वजनाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात चंद्रकांत कांबळे हे जखमी झाले. तसेच स्फोटामुळे आग लागून खोलीच्या छताचे पत्रे आणि खोलीतील घरगुती साहित्य जळून नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमनच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. स्फोट झालेल्या छोट्या सिलेंडरसह एक घरगुती वापराचा गॅस सिलेंडर जळालेल्या अवस्थेत जवानांनी बाहेर काढला. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने घरातील तीन सिलेंडर बाहेर काढण्यात आले. जखमी कांबळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत माहिती मिळताच संत तुकाराम नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्फोट किंवा आगीचे कारण समजू शकले नाही.