पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे सभापती चेतन घुले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी २१ मार्चला निवडणूक होणार आहे. सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सभापतिपदी वर्णी लावण्यासाठी तिघांनी मोर्चेबांधणी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या आदेशानुसार घुले यांनी महापौर शकुंतला धराडे यांच्याकडे राजीनामा दिला होता. हा राजीनामा मंजूर झाला असून, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अर्जांचे वाटप शुक्रवारपर्यंत होणार आहे. सोमवारी दुपारी साडेतीनला छाननी होणार असून, दुपारी चारपर्यंत माघारीची मुदत आहे. गरज भासल्यास दुपारी चारच्या सुमारास प्रत्यक्ष मतदान घेतले जाईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. गेल्या वर्षीच्या आॅक्टोबर महिन्यात घुले यांची सभापतिपदी, तर नाना शिवले यांची उपसभापतिपदी निवड झाली होती. प्रत्येकाला सहा महिने सभापती आणि उपसभापती असा कालावधी देऊन संधी देण्याचे धोरण अवलंबिले. त्यानुसार कालावधी पूर्ण होताच घुले यांनी राजीनामा दिला आहे. (प्रतिनिधी)कोणत्या गटाला संधी? शिक्षण मंडळ सभापती पदाची निवडणूक जाहीर झाल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सदस्यांमध्ये जोरदार चुरस असून निवृत्ती शिंदे, चेतन भुजबळ, शिरीष जाधव हे इच्छुक आहेत. त्यांपैकी पुढील सहा महिन्यांसाठी कोणास संधी मिळते, याबाबतची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. इच्छुकांनी आपणच कसे योग्य आहोत, हे पटवून देण्यासाठी राष्ट्रवादीतील स्थानिक नेते, तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अजित पवार कोणाचे नाव देतात, याकडे लक्ष लागले आहे.
शिक्षण मंडळाची सोमवारी निवडणूक
By admin | Published: March 15, 2016 3:53 AM