-ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : प्रशासनातील समन्वयाचा अभाव आणि झाडे जगविण्याची उदासीनता याचा फटका रावेत येथील मेट्रो इको पार्कला बसत आहे. निवडणूक आयोगाच्या इमारतीसाठी सुमारे १५५ विविध दुर्मीळ देशी व औषधी पर्यावरणपूरक झाडांचा बळी जाणार आहे, त्यामुळे रावेतमधील वैभव समजले जाणारे ‘मेट्रो इको पार्क’ वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी संघटना सरसावल्या आहेत. मात्र, यात मेट्रोच्या चुकीमुळे पर्यावरणप्रेमींच्या रोषाला निवडणूक आयोगाला सामोरे जावे लागते.
मेट्रोच्या विकासकामामुळे झाडे तोडली होती. त्या बदल्यात मेट्रोकडून रावेत येथील मेट्रो पार्कमध्ये झाडे लावून ग्रीन पार्क तयार करण्यात आला. मात्र, यातील काही जागा निवडणूक आयोगाच्या गोदामासाठी जागा आरक्षित करण्यात आली होती. महामेट्रोकडून झाडे लावतांना ग्रीन झोनसह येल्लो झोनमध्येही झाडे लावण्यात आली. झाडे लावताना जागेची पूर्ण माहिती न घेता, मेट्रोच्या ठेकेदारांने झाडे लावली. आता त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे गोदाम होणार आहे. त्यामुळे झाडे तोडण्याची नामुष्की ही निवडणूक आयोगावर आली. मेट्रोच्या ठेकेदारांच्या चुकीमुळे हकनाक दुर्मीळ झाडांचा जीव जाणार आहे.
जागा निवडणूक आयोगाची, चूक मेट्रोची...या ठिकाणची जागा ही निवडणूक आयोगाची आहे. मात्र, विकासक पीसीएनडीएने महामेट्रोला ही जागा झाडे लावण्यासाठी दिली होती. मात्र, त्या ठिकाणी फक्त झाडे लावण्यासाठीच देण्यात आली. कालांतराने पीसीएनडीए बरखास्त होऊन त्या ठिकाणचा ताबा हा महापालिकेकडे आला. महापालिकेने यल्लो झोन असणाऱ्या जागेवर बांधकाम परवाना दिला. त्यामुळे यल्लो झोनमध्ये आलेली झाडे तोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली, तर या ठिकाणी झाडे लावण्यानंतर आमचा कसलाही हस्तक्षेप नसल्याचे मेट्रोकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे झाडांचा बळी जाणार आहे.
चूक कोणाची पेक्षा झाडे महत्त्वाची...रावेत मेट्रो इको पार्कमधील झाडे वाचली पाहिजेत, हा आमचा मुद्दा आहे. ज्या कोणाची चूक असेल, त्यांनी भरपाई करावी. त्यापेक्षाही चूक कोणाचीही असो, झाडे वाचविणे महत्त्वाचे असल्याचे पर्यावरणप्रेमींकडून सांगण्यात येत आहे.
याठिकाणी निवडणूक आयोगाची जागा आहे. त्यातच पार्कसाठी जागा आहे. ग्रीन झोनमधील जागेत झाडे लावण्याबरोबर यल्लो झोन मध्येही मेट्रोने झाडे लावली आहे. त्यात आमची चूक नाही.
- आरती भोसले, उपजिल्हाधिकारी, पुणे.
ती जागा ' पीसीएनटीडीए ' ने दिली होती. आम्ही केवळ झाडे लावण्यासाठी त्या जागेचा आधार घेतला होता. आम्ही झाडे लावल्यानंतर त्याठिकाणी आमचा काहीही हस्तक्षेप राहत नाही.
- हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक जनसंपर्क, पुणे मेट्रो.
मेट्रो पार्कचा झाडे तोडण्याचा विषय आमच्यापर्यंत आला नाही. ती जागा महापालिकेच्या ताब्यात नाही. त्यामुळे महापालिका यात हस्तक्षेप करू शकत नाही.
- प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.