संजय माने . पिंपरीमहापालिका निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गतविधानसभा निवडणुकीपासून एमआयएम (आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन) ची चर्चा सुरू झाली असून, आता या संघटनेने पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची २०१७ मध्ये होणारी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षाकडून वेगाने हलचाली सुरू झाल्या आहेत. ‘एमआयएम’ पक्षाने महापालिकेच्या जागा लढविण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. पुढील आठवड्यात पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीची निवड केली जाणार आहे. त्यासाठी दोन बैठका नुकत्याच झाल्या आहेत, असे एमआयएमचे पुण्यातील कार्यकर्ते अंजूम इनामदार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.महापालिका प्रशासनाने फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीसाठी वॉर्डस्तरीय रचनेचे काम सुरू झाले आहे. या निवडणुकीत उतरण्याची तयारी एमआयएमने केली आहे. केवळ मुस्लीम आणि दलित समाजातीलच नाही, तर अन्य समाजातील जे उमेदवार एमआयएमकडून लढण्यास इच्छुक आहेत, त्यांच्याशी संपर्क आणि आवतन दिले जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही मुस्लीम समाजाचे पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते एमआयएमच्या संपर्कात आहेत. शहरात झालेल्या दोन बैठकांच्या माध्यमातून त्यांची चाचपणी केली.काँग्रेस व राष्ट्रवादीतील अल्पसंख्याक सेल व संघटनेचे काम करणारे अनेक जण एमआयएमच्या माध्यमातून निवडणूक लढण्यासाठी संपर्कात आहेत. (प्रतिनिधी)
‘एमआयएम’ची निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
By admin | Published: September 03, 2015 3:15 AM