पिंपरी : महापालिकेच्या चार विषय समिती सदस्य आणि सभापतींचा कालखंड पूर्ण होत असल्याने येत्या सोमवारी होणाऱ्या महापालिका सर्वसाधारण सभेत नवीन सदस्य निवड होणार आहे. त्यानंतर सभापती निवड होणार असून, युतीधर्मानुसार शिवसेनेलाही सभापतिपदी संधी मिळावी, अशी मागणी होत आहे. यावर सत्ताधारी भाजपा काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपद निवडणुकीत सत्ताधारी भाजपाची सरशी झाली. त्यानंतर चार विषय समिती सदस्यांची निवड होणार आहे. महिला आणि बालकल्याण समिती, विधी समिती, शहर सुधारणा समिती, कला आणि क्रीडा आणि सांस्कृतिक समिती अशा चार समिती सदस्यपदासाठी २० मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निवड प्रक्रिया होणार आहे. गटनेत्यांनी आपल्या पक्षाच्या तौलनिक बलाबलानुसार बंद पाकिटात नावे द्यायची असून, सर्वसाधारण सभेत महापौर राहुल जाधव ही बंद पाकिटे फोडून सदस्यांची नावे जाहीर करीत असतात. महापालिका विधी समितीवर नऊ, महिला आणि बालकल्याण समितीवर नऊ, शहर सुधारणा समितीवर नऊ, कला आणि क्रीडा समितीवर नऊ सदस्य नियुक्त केले जाणार आहेत.विधी समितीतीत एकुण नऊ सदस्य असून पाच सदस्य हे सत्ताधारी भाजपाचे तीन हे राष्ट्रवादीचे तर एक सदस्य शिवसेनेचा असणार आहे. महिला आणि बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती, कला आणि क्रीडा आणि सांस्कृतिक समितीतीही हेच सूत्र असणार आहे.
भाजपाच्या निर्णयाकडे लक्ष महापालिकेतील विविध विषय समितींवरही भाजपाचेच वर्चस्व आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वी शिवसेना आणि भाजपा यांची युती झाली आहे. त्यामुळे महापालिका सत्तेत वाटा मिळणार, अशी शिवसेनेला आशा आहे. याबाबत भाजपा काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सदस्यपदाची निवड केली जाणार आहे.