पिंपरी : इलेक्ट्रिक साहित्याच्या गोदामाला आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. तळवडेतील त्रिवेणी नगर येथील टाॅवर लाइन येथे सोमवारी (दि. ११) रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
पिंपरी -चिंचवड महापालिका अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, नम्रता इलेक्ट्रिक्स अँड केबल हाऊस नावाचे इलेक्ट्रिक दुकानाचे गोदाम टॉवर लाईन जवळ आहे. सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांच्या गोदामामध्ये आग लागली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी - चिंचवड अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यासह टाटा कंपनी, बजाज कंपनी तसेच एमआयडीसीचे बंब देखील घटनास्थळी दाखल झाले. एकूण १४ बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या ६८ जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
आग मोठ्या प्रमाणात असल्याने गोदामातून धुराचे लोट येत होते. त्यामुळे जेसीबीच्या साह्याने साहित्य बाजूला करून आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आग लागली त्यावेळी गोदामात कोणीही नव्हते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोदामामध्ये इलेक्ट्रिक केबल, बोर्ड आणि इतर साहित्य होते. हे साहित्य आगीत खाक झाले.