पिंपरी : इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने थरमॅक्स चौक चिंचवड येथील एका हॉटेलमध्ये आग लागली. ही घटना गुरुवारी (दि. ११) रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
थरमॅक्स चौकातील चार मजली हॉटेल मध्ये तळमजल्यावर आग लागली. याबाबत अग्निशमन विभागास माहिती देण्यात आली. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्र, प्राधिकरण उपकेंद्र आणि चिखली उपकेंद्र येथून तीन बंब घटनास्थळी दाखल झाले.
हॉटेलच्या तळमजल्यामध्ये असलेल्या मीटर बॉक्समध्ये आग असल्याचे आढळून आले. त्यामुळे सुरुवातीला एबीसी फायर एक्सटिंगुइशर मारून आग विझवण्यात आली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित केल्यानंतर पाणी मारून आग पूर्णपणे विझवली.
आगीची घटना घडली त्यावेळी हॉटेलमध्ये अकरा कर्मचारी आणि आठ गेस्ट होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. यामध्ये हॉटेलचे मीटर बॉक्स, वायरिंग आणि फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.