पुणे : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरी संपल्यानंतर आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर येत्या २५ आॅगस्टपासून पुढची प्रवेश फेरी सुरू होणार आहे. त्यासाठी ३ प्रवर्ग तयार करण्यात आले आहेत. पहिला प्रवर्ग ८० ते १०० टक्के, दुसरा प्रवर्ग ६० ते ८० टक्के व तिसरा प्रवर्ग ३५ ते ६० टक्के यानुसार प्रवेश दिले जाणार आहेत. या फेरीमध्ये प्रवेश घेऊन रदद् करणारे, प्रथम प्राधान्याचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणारे, प्रवेश न मिळालेले अशा सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे.अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय पध्दतीने सुरू असलेल्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी ७५ हजार ९३९ अर्ज आले होते. त्यापैकी ७ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित आहेत. येत्या २५ आॅगस्टपासून प्रथम येणाºया प्रथम प्राधान्य ही फेरी राबविली जाणार आहे.विशेष फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी बुधवार पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर सर्व महाविद्यालयांमधील रिक्त असलेल्या जागांचा तपशील २५ आॅगस्ट रोजी संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर २७ आॅगस्ट रोजी ८० ते १०० टक्के दरम्यान गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध असेल. यामध्ये रिक्त जागेवर सर्वात पहिल्यांदा क्लिक करणाºया विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होत जातील. यानुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २७ ते २८ आॅगस्ट दरम्यान प्रवेश घ्यायचे आहेत. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांची यादी २८ आॅगस्ट रोजी जाहीर होईल. त्यानंतर दुसºया प्रवर्गातील ६० ते ८० टक्क्यांदरम्यान गुण असलेल्या विद्यार्थ्यांना २९ ते ३० आॅगस्ट दरम्यान प्रवेश घेण्यासाठी संधी असेल.
अकरावी प्रवेश : प्राधान्य फेरी २५ आॅगस्टपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 2:03 AM