वाकड - महापालिकेकडून वाकड आणि परिसरास अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. याच्या निषेधार्थ सभा घेऊन मोर्चा काढण्यात आला. पिंपरी-चिंचवड को-आॅप. हाउसिंग सोसायटीज् फेडरेशन (पुणे शहर ३) (महासंघ) यांच्या वतीने शनिवारी (दि. ३) सकाळी १०ला आंदोलन करण्यात आले. ड्यू डेल सोसायटी ते दत्त मंदिर या मार्गावर निषेध मोर्चा काढण्यात आला. महापालिकेचे सहायक अभियंता प्रवीण धुमाळयांना मागण्यांचे निवेदन देण्यातआले.हाउसिंग सोसायट्यांमधील ३५०पेक्षा अधिक रहिवासी या वेळी उपस्थित होते. पाणीवाटपातील प्रशासनाच्या सापत्न वागणुकीबाबत या वेळी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आले. आपल्या स्वागतपर भाषणात महासंघाचे प्रतिनिधी सुधीर देशमुख यांनी संघाची उद्दिष्टे विशद करून त्यास वैधानिक स्वरूप प्राप्त होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देत ते म्हणाले की, जरी महासंघ वेगवेगळ्या समस्यांच्या निराकरणासाठी प्रयत्नात असला, तरी अपुरा पाणीपुरवठा ही वाकड परिसरासाठी सदैव संवेदनशील बनलेली समस्या हाताळण्यास आम्ही प्राधान्य दिले आहे.या भागातील रहिवाशांकडून कर संकलनाच्या माध्यमातून महापालिकेस भरपूर उत्पन्न मिळत आहे. तथापि प्रशासनाचे पाणीवाटपाचे तागडे अन्यत्र झुकलेले दिसून येते. आंदोलनाचा मार्ग स्वीकारूनदेखील महापालिकेच्या धोरणात काहीच फरक पडणार नसेल, तर महासंघास अन्य वैधानिक पर्यायांचा विचार करावा लागेल. ज्यामध्ये जनहित याचिका हादेखील पर्याय असू शकतो. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही. किंबहुना या प्रभागातील महापालिका लोकप्रतिनिधी याबाबत प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. त्यास पूरक अशीच संघाची भूमिका आहे, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.महासंघाचे प्रवक्ते अरुण देशमुख म्हणाले की, आंदोलनाची भूमिका घेण्यापूर्वी आम्ही महापालिका प्रशासनास वेळोवेळी निवेदने दिली होती; पण प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे आम्हास हा मार्ग स्वीकारणे भाग पडले आहे.वाकडच्या पाणीप्रश्नावर आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एक असून, त्याच्या सोडवणुकीसाठी आम्ही पक्षविरहित भावनेने प्रयत्नशील आहोत, असेराहुल कलाटे आणि मयूर कलाटे यांनी या वेळी विशद केले. तुषार कामठे यांनी स्पष्ट केले की, कस्पटे वस्ती परिसरात बायपास पाइपलाइन टाकण्यात आली आहे. त्यामुळे तेथील पाण्याच्या समस्येचे निराकरण झाले आहे.आपल्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सोसायट्यांनी महासंघाचे सभासदत्व स्वीकारावे, असे आवाहन महासंघाचे प्रतिनिधी सचिन लोंढे यांनी केले. महासंघाचे सचिव के. सी. गर्ग यांनी आभार मानले.कर भरण्याबाबत विचार करावा लागेलमहासंघाचे अध्यक्ष सुदेश राजे म्हणाले की, सामान्य नागरिकांनाएमएलडी अथवा टीएमसी ही तांत्रिक परिभाषा ठाऊक नसून, त्यांना पुरेसे पाणी हवे आहे. प्रामाणिकपणे करभरणा करूनदेखील प्रशासन पाणी पुरवठा करणार नसेल, तर कर भरावा की न भरावा यावर देखील गांभीर्याने विचार करावा लागेल.