पिंपरी : कंपनीचे स्पेशल पर्पज मशीन, डाटा, डिझाईन्स, ग्राहकांचा तपशील ही माहिती चोरली. ती माहिती दुसऱ्या कंपनीला देत प्रोडक्ट मटेरिअल तयार करून घेतले. ते स्वतःच्या कंपनीच्या नावावर विकून ४८ लाख रुपयांची कंपनीची फसवणूक केली. याप्रकरणी कंपनीच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला. चिंचवड एमआयडीसीमधील ॲडव्हेंट कंपनीत २३ ऑक्टोबर २०१८ ते १४ ऑक्टोबर २०२२ या चार वर्षाच्या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला.
याप्रकरणी महिलेने बुधवारी (दि. २९) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आकाश रमेश लिंबाचिया (३१, रा. पुनावळे) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंबाचिया हा ॲडव्हेंट कंपनी येथे काम करत होता. यावेळी त्याने त्याची आर अँड डी टेक्नॉलॉजीज या नावाने कंपनी बनवली. ॲडव्हेंट कंपनीचा डाटा, गोपनीय माहिती, प्रेस टुल्स, कंपनीने बिजनेससाठी तयार केलेले स्पेशल पर्पज मशीन कस्टमर इनक्वायरी या साऱ्या गोष्टी परस्पर चोरून दुसऱ्या कंपनीला दिल्या. त्या कंपनीकडून प्रोडक्ट मटेरिअल तयार करून घेतले व ते स्वतःच्या आर अँड डी टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या नावाने विकले.
या कालावधीत त्याने कंपनीचा डाटा वापरून ४८ लाख रुपयांचा बिजनेस केला व ॲडव्हेंट कंपनीकडून ४० लाख ६५ हजार ७३६ रुपये पगाराची रक्कम देखील घेतली. कंपीनीची फसवणूक करत अपहार केला, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुळीग तपास करीत आहेत.