पुणे : चिंचवड विधानसभा पोट निवडणूकीत महाविकास आघाडीचा उमेदवारीचा तीन दिवस सुरू असणारा तिढा सुटला असून नाना काटे यांना मंगळवारी सकाळी उमेदवारी जाहिर केली आहे. मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यांनतर नाना काटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. लक्ष्मण जगताप यांच्याबाबत विचारले असता त्यांनी सहानुभूती आणि राजकारण वेगळं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
काटे म्हणाले, लक्ष्मण जगताप हे कर्तृत्ववान आमदार होते. त्यांनी या विधानसभेसाठी चांगली कामे केली आहेत. त्यांच्या निधनानंतर अजित दादा, पवार साहेब आम्ही सगळे त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीला गेलो होतो. सहानुभूती आम्हाला पण होती. परंतु सहानुभूती आणि राजकारण वेगळं आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार आहोत. आज आमच्या मागणीला यश आले. आम्हाला गटबाजीची अजिबात भीती नाही. महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असणार आहे. आम्ही ही निवडणूक चांगल्या पद्धतीने लढवून विजय मिळवणार आहोत.
नाना काटे यांना उमेदवारी जाहीर
राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, नवनाथ जगताप, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, माया बारणे, राजेंद्र जगताप हे इच्छुक होते. त्यांची मनधरणी करण्याचे काम तीन दिवसांपासून सुरू होते. नेते आणि इच्छुकांमधील चर्चांची खलबते दिवसभर सुरू होती. तसेच या मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटनेही दावा केलेला होता. त्यामुळे तिघांपैकी नक्की हा मतदारसंघ कोणाला सोडला जाईल, याबाबत उत्सुकता होती. उमेदवारीचे घोंगडे भिजत पडले होती. सोमवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड परिसरातील एका हॉटेलमध्ये रात्री बैठक झाली. त्यात उमेदवारीवर चर्चा करण्यात आली. रात्री बारापर्यंत उमेदवारी जाहिर केली नाही. मंगळवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.