पिंपरी : शहराला भयमुक्त करण्यासाठी गुन्यांई च्या तपासावर भर देण्यात येत आहे. त्यातून गुन्हे उघडकीस येऊन गुन्हेगारांवर कारवाई होईल. त्याला प्राधान्य असून, यातून गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत चाकण विभागासाठी सहायक पोलीस आयुक्त यांच्यासाठी च-होली फाटा नवीन कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले. त्याच्या कोनशिलेचे अनावरण कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २३) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर, सहायक आयुक्त राम जाधव, डॉ. सागर कवडे उपस्थित होते.
चाकण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राम जाधव यांनी १६ एन्काउंटर करून अट्टल गुन्हेगारांना ‘यमसदनी’ पाठवले आहे. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक करून कृष्ण प्रकाश म्हणाले, तशी कामगिरी आता होणे अपेक्षित आहे. त्यातून गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत होईल. एक आस्थापना म्हणून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नवीन आहे. त्यामुळे या आयुक्तालयांतर्गत नागरिकांच्या सुविधेसाठी अनेक उपक्रम राबविणे आवश्यक आहे.
आयुक्तांनी सहायक आयुक्तांना दिला ‘मान’ सहायक पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कोनशिलेचे अनावरण आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले. त्यानंतर सहायक आयुक्त राम जाधव यांना फित कापण्यास सांगून आयुक्तांनी त्यांना ‘मान’ दिला. तसेच कार्यालय प्रमुख म्हणून खुर्चीत तुम्हीच बसा, असा आग्रह देखील आयुक्तांनी केल्याने राम जाधव यांनी खुर्चीत बसून आयुक्तांचा सन्मान स्वीकारला. याच नवीन इमारतीत च-होली पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या हस्ते फित कापून चौकी कार्यान्वित करण्यात आली.