पिंपरी : चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहातील लिपिकाने भाड्याची १८ लाखांची रक्कम हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाने डोळेझाक केली आहे. महापालिकेने केवळ नोटिसीच्या सोपस्कारावर भागवले आहे.
महापालिकेची पाच नाट्यगृहे, प्रेक्षागृहे आहेत. चिंचवडला प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृह, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह, नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह आणि निगडी-प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह यांचा त्यात समावेश आहे. खासगी सभागृहांपेक्षा त्यांचे दर वाजवी आहेत. त्यामुळे व्यावसायिक नाटक, राजकीय-सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक संस्थांचे मेळावे-गॅदरिंग, इतर मेळावे, समारंभ, स्पर्धा, खासगी कार्यक्रमांची येथे रेलचेल असते. मात्र, चिंचवड येथील या कर्मचाऱ्याने याचा हिशेबच ठेवला नसल्याचे उघडकीस आले आहे. सुमारे १८ लाखांचा अपहार असल्याचे दिसून येत आहे.
नेमका प्रकार काय?
प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात संकेत जंगम हा लिपिक होता. तेथील व्यवस्थापक निवृत्त झाल्यानंतर नाट्यगृहाची अतिरिक्त जबाबदारी जंगमकडे आली. मात्र, त्याने त्याच्या कार्यकाळात झालेले कार्यक्रम व रक्कम किती जमा झाली आहे, याचा हिशेबच ठेवलेला नाही. हा प्रकार दोन वर्षे सुरू होता. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही त्याकडे डोळेझाक का केली, असा सवाल उपस्थित होत आहे.
असे अडकले पैसे...
महापालिकेचे नाट्यगृह भाडेतत्त्वावर देण्यासाठी संबंधितांकडून १५ दिवस आधी अनामत घेतली जाते. काही जण डीडी अथवा धनादेशाने रक्कम देतात. काही संस्थांचे धनादेश वेळेत भरले गेले नाहीत. त्यामुळे ती रक्कम महापालिकेला मिळाली नाही. त्यात खासगी नाट्यसंस्था, राज्य शासन, महापालिका या संस्थांचा समावेश आहे. प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहाची थकबाकी १८ लाखांच्या घरांत पोहोचली आहे.