पिंपरी : जुन्या पेन्शन याेजनेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी गुरूवार (दि. १४) पासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात शहरातील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, तहसील कार्यालय, निगडी आणि भाेसरी शिधापत्रिका कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये एकच मिशन जुनी पेन्शन असा नारा देत सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यापूर्वी मार्च महिन्यात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्व सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते. संप मागे घेताना एक समिती नेमली होती. तीन महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र, आठ महिने होऊनही कोणताही निर्णय न झाल्याने शासकीय कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.
दरम्यान, शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय, तहसील कार्यालय, निगडी आणि भाेसरी शिधापत्रिका कार्यालयातील बहुतांशी तर पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. यामुळे या सर्व कार्यालय परिसरात शुकशुकाट दिसून येत हाेता. तर विविध कामासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती घरी जावे लागले.महापालिका कर्मचाऱ्यांची संपाकडे पाठ-
पिंपरी चिंचवड महापालिकेतील कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या संपाकडे पाठ फिरवली आहे. गुरूवारी केलेल्या संपामध्ये महापालिकेतील एकही कर्मचारी सहभागी झाला नाही. तर यासंदर्भात राज्य सरकारशी बोलणे सुरू असून सकारात्मक निर्णय होईल अशी प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी दिली.