पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील साडेसात हजारपैकी चार हजार आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) ५५ टक्के कर्मचारी लोकसभा निवडणुकीसाठी जुंपले आहेत. अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त राहणार असल्याने विकासाची कामे ठप्प होणार आहेत. तसेच, निवडणूक काळात कारभार थंडावणार आहे.निवडणुकीला राष्ट्रीय कार्य मानण्यात येते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यात शासकीय, प्रशासकीय आस्थापनांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेण्यात येते. त्यानुसार निवडणुकीच्या कामासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. दि. १० मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभेच्या पुणे व बारामतीसाठी २३ एप्रिल, तसेच शिरूर आणि मावळ मतदारसंघांमध्ये २९ एप्रिल रोजी मतदान आहे. चारही मतदारसंघांतील निवडणूक कामांना वेग आला आहे.महापालिका हद्दीत चिंचवड, भोसरी आणि पिंपरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा मावळ लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. भोसरी मतदारसंघ शिरुर मतदारसंघात समावेश आहे. पीएमआरडी अंतर्गत चारही मतदार संघाचा काही भाग येत आहे. त्यामुळे पीएमआरडीतील कर्मचारीही निवडणुकीच्या कामांसाठी व्यस्त राहणार आहेत.आचारसंहिता लागू झाल्यापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील राजकीय पक्ष आणि पदाधिकाºयांचे जाहिरातफलक काढण्यास सुरुवात केली आहे. यासह निवडणुकीशी संबंधित कामांनाही महापालिका प्रशासनाकडून वेग आला आहे. आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच, प्रत्येक पथकाकडे वेगळी जबाबदारी देण्यात आली आहे.प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागी होणाºया कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागाकडून कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. मतदानाच्या मशिनची जोडणी, हाताळणी आदींबाबत या कर्मचाºयांना प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात येणार आहे.महापालिकेचे सुमारे चार हजार कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त राहणार आहेत. कीटकनाशक, आरोग्य, सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाºयांचा यात समावेश आहे. पालिकेच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. असे असले, तरी राष्ट्रीय कार्य म्हणून निवडणुकीच्या कामकाजास प्राधान्य देण्यात येत आहे. सर्वसामान्यांची महापालिकेशी संबंधित कामे खोळंबणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.निवडणुका हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाºयांची निवडणुकीच्या कामाबरोबरच नियमित कामेही सुरू राहणार आहेत. थोडाफार कामकाजावर परिणाम होईल. परंतु, कंत्राटी कर्मचा-यांना निवडणुकीच्या कामाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. - श्रावण हर्डीकर, आयुक्तलोकशाही पद्धतीमध्ये निवडणुका होणे आवश्यक आहेत. त्यामुळे शासकीय संस्थातील अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामकाजामध्ये सहभागी होतात. मात्र, पीएमआरडीएच्या नियमित कामकाजावर त्याचा कोणताही परिणाम होऊ दिला जाणार नाही. आॅन ड्युटी निवडणुकीचे कामकाज सुरू राहणार आहे.- विक्रम कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमआरडीए
कर्मचाऱ्यांना निवडणुकीसाठी जुंपल्याने कारभार थंडावणार, विकासकामे ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 3:03 AM