चिंचवड : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध कामांसाठी महिलांना रोजगार मिळत आहे. चिंचवडमधील दळवीनगर, वेताळनगर, आनंदनगर, विजयनगर भागातील महिला सध्या इच्छुक उमेदवारांच्या प्रचार कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे. काही दिवसांसाठी का होईना, परंतु महिला वर्गावर सुगीचे दिवस आले आहेत. प्रभाग पद्धतीमुळे मतदारसंख्याही वाढली आहे. इच्छुक उमेदवारांना प्रभागातील प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य होत नसल्याने प्रचार करण्यासाठी रोजंदारी पद्धतीने महिलांना बोलविले जात आहे. प्रचार साहित्य बरोबर देऊन त्यांचे गट विविध भागात पाठविले जात आहेत. या कामासाठी पैशांबरोबरच चहा, नाष्टा व भोजन व्यवस्थाही केली जात आहे.चिंचवडमधील एका इच्छुक उमेदवाराने प्रचारात सहभागी होणाऱ्या महिलांना विविध वस्तूही भेट दिल्या आहेत. मतदारांशी बोलताना काय बोलावे याची कार्यशाळा घेतली जात आहे.प्रभाग पद्धतीमुळे विविध राजकीय पक्षांचे व अपक्ष इच्छुक उमेदवारांचा प्रचार सध्या सुरू आहे. पक्षाचे उमेदवार अजून निश्चित झाले नसल्याने अनेकजण आपणच तिकीट मिळविणार असल्याचा प्रचार करीत आहेत. हातात पत्रकांचे गठ्ठे घेऊन प्रभागात फिरणाऱ्या महिला सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. (वार्ताहर)
प्रचारामुळे मिळतोय महिलांना रोजगार
By admin | Published: January 24, 2017 2:13 AM