चाकण : सध्याचा काळ भयाण वेगाने चालला असून ‘सैराट’पणे वागणाऱ्या नवीन पिढीला आदर्श घालून द्यायचा असेल, तर गावाचे गावपण जपले पाहिजे आणि हे काम खराबवाडीने केलेय. अवघ्या महाराष्ट्राला शोभेल असा आदर्शवत सामुदायिक चौत भारणीचा कार्यक्रम करून खराबवाडीने पुढच्या पिढीला आदर्श घालून दिला आहे, असे प्रतिपादन धर्माचार्य हभप शंकरमहाराज शेवाळे यांनी केले.
खराबवाडी येथील हनुमान मंदिरात आयोजित गावातील ११ दिवंगत व्यक्तींच्या चतुर्थी भरणी श्राद्ध कार्यक्रमात ते बोलत होते. सप्टेंबर २०१७ ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत दिवंगत झालेल्या गावातील जिजाबाई राघू खराबी, दशरथ गणाजी कड, हभप ज्ञानोबा शंकर देवकर, हभप गजराबाई ज्ञानोबा देवकर, नबूबाई अंनत धाडगे, अनुसयाबाई तुकाराम कड, हभप शाऊबाई विठ्ठल खराबी, उत्तम गणाजी कड, मुक्ताबाई निवृत्ती खराबी, पार्वतीबाई शंकर केसवड व सुभद्राबाई बाबासाहेब कड या ११ व्यक्तींचा चौत भरणीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमातील सहभागी कुटुंबीयांकडून गण व सुवासिनींना सन्मानित करण्यात आले. चौत भरणीसारखा कार्यक्रम सामुदायिकरीत्या साजरा केल्याने या कार्यक्रमाची खेड तालुक्यात सकारात्मक चर्चा रंगली.आमदार सुरेश गोरे म्हणाले, ‘‘खराबवाडीतील ११ दिवंगत व्यक्तींनी त्यांचे जीवन आदर्श पद्धतीने जगून आपल्या कुटुंबावर संस्कार घडविले. म्हणूनच कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी ठेवून हा चौत भरणीसारखा घरगुती कार्यक्रम मंदिरात सामुदायिकपणे केला.’’
हभप भरतमहाराज थोरात म्हणाले, ‘‘खराबवाडीने अनेक चांगले सामाजिक उपक्रम राबविले असून आणखी एका उपक्रमाची त्यात भर पडली आहे.’’ या वेळी आमदार सुरेश गोरे, माजी आमदार दिलीप मोहिते, हभप भरतमहाराज थोरात, माजी जि.प. सदस्य किरण मांजरे, माजी सदस्य अरुणा खराबी, पं.स.चे माजी उपसभापती अमोल पवार, माजी उपसभापती संभाजी खराबी, खेड तालुका वारकरी संप्रदाय परिवाराचे विनोद महाळुंकर, सरपंच जीवन खराबी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रघुनाथ खराबी, राष्ट्रवादीचे तालुका खजिनदार अरुण सोमवंशी, शिवसेना ग्राहक सेनेचे उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण जाधव, भाजपाचे जिल्हा संपर्कप्रमुख संदीप सोमवंशी, मनसेचे उपजिल्हा प्रमुख मनोज खराबी, काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा जया मोरे, राष्ट्रवादीच्या तालुका उपाध्यक्षा शुभांगी पठारे, माजी उपसभापती कैलास गाळव, संचालक राम गोरे, माजी सरपंच नागेश खराबी, हनुमंत कड, सागर खराबी, काळूराम केसवड आदी उपस्थित होते. माजी उपसरपंच प्रकाश खराबी यांनी सूत्रसंचालन केले.