सांगवी : रावेत-औंध बीआरटीएस मार्गावर सांगवी फाटा येथे फळ विक्रेते व इतर विक्रेत्यांकडून भर रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. रहदारीच्या रस्त्यावर ठाण मांडल्याने येथे वाहतुकीस अडथळा होत आहे. अपघाताचाही धोका वाढला आहे. महापालिकेकडून व पोलीस प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. भर रस्त्यात बस्तान मांडलेल्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.विविध प्रकारचे घरगुती सामान व विविध प्रकारची फळे विकताना नेहमीच या रस्त्यावर जवळपास साठ ते सत्तर तीनचाकी रिक्षा लावून विक्रेते विक्री करताना दिसून येतात. यासाठी नागरिक मुख्य रस्त्यावर आपली वाहने उभी करून वाहतूक नियम धाब्यावर बसवून फळे आणि वस्तू खरेदी करतात. त्यामुळे रस्त्यावर संध्याकाळी पुण्याकडून वाकड व काळेवाडीकडे जाणाऱ्या वाहनांना रहदारीस अडथळा ठरून वेगात येणारी वाहने येथे थांबलेल्या वाहनांना धडकून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादवेळेस येथे वाहतूक पोलीस कर्मचारी दिसून येतात.त्यामुळे व्यावसायिक तात्पुरते पलायन करतात. पण पुन्हा आहे तीच परिस्थिती दिसून येते. महापालिका अशा व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची कारवाई का करत नाही हे आश्चर्याची गोष्ट आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, वाकड आणि परिसरातील इतर मुख्य रस्त्यांवर असे विक्रेते कोणत्याही प्रकारची काळजी न घेता नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहेत.अनधिकृतपणे येथे विक्रेते व्यवसाय करताना दिसून येत आहेत. मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न नागरिक आणि वाहनचालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करणाºया विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांच्याकडून होत आहे. येथे कायमस्वरूपी एक वाहतूक पोलीस नियुक्त करण्यात यावा, अशीही मागणी आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरील विक्रेत्यांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.फळ विक्रेत्यांचे मुख्य रस्त्यावर बस्तानखडकी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर खडकी बाजार पीएमपी बस स्थानक ते बोपोडी चौकदरम्यान फळांच्या हातगाड्या लागत असल्यामुळे संपूर्ण रस्त्याला फळ मार्केटचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र रस्ता अरुंद असल्यामुळे व हातगाड्या रस्त्यामध्ये आल्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाची गाडी दिवसभर रिकामी खडकी बाजारातून फिरताना दिसते. मात्र कोणावरही कारवाई केली जात नसल्यामुळे अतिक्रमण विभागाचा उपयोग काय, असा सवाल खडकीकर करीत आहेत.महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडूनही दुर्लक्षमागील अनेक वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. तसेच या रस्त्यावर अतिक्रमणही वाढले आहे. पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड या दोन्हींची हद्द या रस्त्याच्या माध्यभागापासून सुरू होते़ पुणे महापालिकेच्या औंध क्षेत्रीय कार्यालयाकडूनही अतिक्रमण कारवाई करण्यात येत नाही.संयुक्त कारवाईची नागरिकांकडून मागणीखडकी बोर्डाच्या सुस्त कर्मचारी वा अधिकाºयांमुळे या रस्त्यावर समस्याच समस्या पहावयास मिळत आहेत. याकरिता पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे संयुक्तपणे अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात यावी व येथील अनधिकृत हातगाड्या हद्दपार करण्याची मागणी खडकी बोपोडीकरांनी केली आहे.
औंध-रावेत बीआरटीएस मार्गावर व्यावसायिकांनी केले अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 2:23 AM