पुणे : राज्यस्तरीय आंतरजिल्हा १६ वर्षांखालील युथ गटाच्या आंतरजिल्हा बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात पुणे संघाला धुळे संघाकडून तृतीय क्रमांकाच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले. दुसरीकडे पुण्याच्या मुलांच्या संघाला मात्र तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या वतीने इंदिरा नॅशनल स्कूलच्या कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या तृतीय क्रमाकांच्या लढतीत परीधी भागवत (१९), करिना सूर्यवंशी (१४) यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर धुळे संघाने बलाढ्य पुणे संघाला ६५-६१ गुणांनी नमवित तृतीय क्रमांक जिंकला. पराभूत पुणे संघाकडून राधिका पारीख (२४), निधी पार्लेचा (१४) व इशा घारपुरे (७) यांनी आपल्या संघाचा पराभव टाळण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. राधिका पारीख व ईशा घारपुरेला आपल्या खेळातील सातत्य राखण्यात अपयश आले. तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या सामन्यात मुबंई नॉर्थ संघाने पुणे संघाला ७०-५७ गुणांनी पराभूत केले होते. विजयी संघाकडून सुझाने पिंटोने ३०, वैभवी तावडेने १२, औरीय एम.ने ९ गुण केले. पराभूत पुणे संघाकडून इशा घारपुरेने २१, निधी पार्लेचाने ११ व राधिका पारीखने ७ गुण नोंदविले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात नागपूर संघाने धुळे संघाला ५९-३९ गुणांनी पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. नागपूरकडून सिया देवधरने १२, देवश्री आंबेगावकरने १२, पूर्वी महालेने ८ गुण करून आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. मुलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात अरमान माळी (१८), ओम पवार (१६) व प्रीतेश कोकाटे (१४) यांच्या उत्कृष्ट व जलद खेळामुळे विजेतेपदाचा संभाव्य संघ समजल्या जाणाऱ्या पुणे संघाने मुंबई साऊथ वेस्ट संघाला ६६-६३ असा अवघ्या तीन गुणांनी पराभव केला. पराभूत संघाकडून हाझीप बेगने २०, दानिश सय्यदने १५ गुण केले. मुंबई साऊथ वेस्ट संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट पासिंग व अचूक बास्केट करून पुणे संघाला पराभूत केले. पुणे संघाच्या खेळाडूंनी मुुंबईच्या खेळाडूंना रोखण्यात अपयश आले.तत्पूर्वी पहिल्या उपांत्य लढतीत नागपूरने मुबंई साऊथ वेस्ट संघाला ९९-७० गुणांनी नमविले. नागपूरकडून समित जोशीने २९, शर्वरी बोमनवारने २५, सिद्धेश कुलकर्णीने १६ गुण केले. पराभूत मुंबई साऊथ वेस्ट संघाकडून हाझीप बेगने २४, मुदस्सर सय्यदने २३ गुण केले. दुसऱ्या उपांत्य लढतीत मुंबई नॉर्थ संघाने पुणे संघाला ९७-८१ गुणांनी पराभूत करून अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली. विजयी संघाकडून अर्जुन यादवने २७, दिलीप हरिजानने २४, कमलेश राजभोरने २१ गुण केले. पराभूत पुणे संघाकडून यश पागरने २७, ओम पवारने १४ व प्रीतेश कोकाटेने १४ गुण केले.
पुण्याच्या मुलींचे आव्हान संपुष्टात
By admin | Published: May 05, 2017 2:58 AM