पिंपरी : घरासाठी कर्ज म्हणून घेतलेली रक्कम ‘टास्क’मध्ये गुंतवली. मात्र, त्यातून ३५ लाख ३१ हजारांची फसवणूक झाल्याने आयटी इंजिनियरवर पश्चाताप करण्याची वेळ आली. फसवणुकीचा हा प्रकार मामुर्डी, देहूरोड येथे ४ डिसेंबर २०२२ ते १७ मार्च २०२३ या कालवधीत घडला.
सुनीलकुमार दिनेशकुमार यादव (वय ३६, रा. मामुर्डी, देहूरोड) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २६) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कायरा संजय विक्रम आणि कस्टमर केअरवरील अनोळखी इसमांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनीलकुमार यादव हे अभियंता आहेत. त्यांनी घरासाठी कर्ज घेतले होते. त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात होती. दरम्यान, फिर्यादीच्या टेलिग्राम अकाउंटवर आरोपींनी मेसेज पाठवला. मुव्हीचा रिव्ह्यु टास्क दिला. त्यासाठी सुरवातीला फिर्यादीला बक्षीस दिले. त्यातून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ‘टास्क’साठी आणखी पैसे गुंतवण्यास सांगून फिर्यादीची ऑनलाइन फसवणूक करून ३५ लाख ३१ हजार रुपयांचा अपहार केला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी तपास करीत आहेत.