पिंपरी : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का, अशी विचारणा करून साॅफ्टवेअर इंजिनीअरला टास्क दिला. त्यासाठी सुरुवातीला मोबदला दिला. त्यानंतर मोठा टास्क देऊन ऑनलाइन पद्धतीने रक्कम भरण्यास भाग पाडून सात लाख तीन हजार २७० रुपयांचा गंडा घातला. थेरगाव येथे २८ ते २९ सप्टेंबर या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला.
स्वप्निल व्यंकटराव सुभेदार (३०, रा. थेरगाव) यांनी या प्रकरणी मंगळवारी (दि. २) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार टेलिग्राम आयडीधारक देव, व्हिना नायर आणि व्हॉट्सॲप क्रमांकधारक तसेच विविध बँकांचे खातेधारक असलेल्या संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
फिर्यादी स्वप्निल सुभेदार साॅफ्टवेअर इंजिनीअर आहेत. बेरोजगार असल्याने ते नोकरीच्या शोधात होते. त्यासाठी त्यांनी वेबसाईटवर नोकरीसाठी अर्ज केला. त्यानंतर संशयितांनी त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर मेसेज पाठवला. ‘तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का?’ अशी विचारणा केली. स्वप्निल यांनी त्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर संशयितांनी त्यांना टेलिग्रामद्वारे टास्क दिला. रिव्ह्यू देण्याचा एक टास्क पूर्ण केल्यानंतर स्वप्निल यांना दीडशे रुपये दिले.
त्यानंतर टास्कचा मोबदला म्हणून आणखी काही पैसे त्यांना ऑनलाइन पद्धतीने दिले. त्यानंतर जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून पुढील टास्कसाठी काही रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार स्वप्निल यांनी त्यांच्याकडील रक्कम भरली. तो टास्क पूर्ण झाला असून, त्याची रक्कम काढण्यासाठी आणखी दुसरा टास्क पूर्ण करावा लागेल, त्यासाठी काही रक्कम गुंतवणूक करावी लागेल, असे संशयितांनी सांगितले. त्यानुसार विविध बँकांच्या खात्यांवर आणखी काही रक्कम भरली. त्यासाठी त्यांनी पत्नी तसेच मित्रांकडून पैसे घेतले. एकाच दिवसात त्यांनी सात लाख ३ हजार २७० रुपये भरले. त्यानंतरही संशयितांनी त्यांना मोबदल्याची रक्कम किंवा त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत दिली नाही. पोलिस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंखे तपास करीत आहेत.