लोकमत न्यूज नेटवर्कदेहूगाव : येथील वैंकुठगमण मंदिर ते मुख्यमंदिर रस्त्यावर ५० फूट लांब व ३० फूट उंचीची जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज मुख्यमंदिर चौदा टाळकरी प्रवेशद्वार उत्तरमुखी कमान उभारली जात आहे. उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून या कमानीचे पालखी सोहळ्याच्या वेळी लोकार्पण केले जाणार आहे.कमानीची रचना सुबक व आकर्षक असून बांधकाम आरसीसीमध्ये केले आहे. त्यावर सव्वा अकरा फूट उंचीचे मंदिर असणार आहे. कमानीच्या दोन्ही खांबावर १६ देवळ्या असून यातील एका देवळीमध्ये छत्रपती शिवाजीमहाराज व अनगडशहा वली बाबा यांच्यासह १४ टाळकऱ्यांच्या संगमरवरी दगडामध्ये घडवलेल्या अडीच फूट उंचीच्या मूर्ती बसविण्यात येणार आहेत. या दोन्ही खांबावर जय विजय द्वारपालांच्या मूर्तीही उभारण्यात येणार आहेत. कमानीच्या वर ११ फूट ३ इंच उंचीचे, ९ फूट रुंद व १६ फूट लांब असे गुलाबी वालुकामय दगडामध्ये मंदिर उभारण्यात येत आहे. मंदिराला मुख्य तीन कमानी असून त्यावर तीन घुमट आहेत. यातील पूर्वेकडील कमानीमध्ये श्री संत ज्ञानेश्वरमहाराज, मध्यभागी विठ्ठल-रुक्मिणी व पश्चिमेच्या कमानीमध्ये श्री संत तुकाराम महाराजांची मूर्ती बसविण्यात येतील.कमानीवरील मुख्य घुमटांच्या आजूबाजूला आठ छोटे घुमट असणार आहेत. घुमटाच्या अंतर्भागात आणखी सहा कमानी आहेत. या कमानीयुक्त मंदिर १२ खांबावर उभारण्यात आले आहे. प्रत्येक खांब कमळाच्या फुलावर उभे असल्याचा भास निर्माण होतो. दोन खांबाच्या मध्ये कमानी आहेत. आधार पट्ट्या (केवाल) त्यावर सज्जा असून त्यावर तीन कलश घुमट असणार आहेत. खांबांवर व कमानींवर पानांफुलांची आकर्षक नक्षीकाम केले आहे. गावाच्या वैभवात भरमंदिर कमानीने देहूच्या वैभवात भर पडणार आहे. आमदार संजय भेगडे, जि.प. सदस्य बाबूराव वायकर, लोहगावचे माजी उपसरपंच सोमनाथ मोझे, बांधकाम व्यावसायिक लक्ष्मण जाधव आदींच्या सहकार्यातून उभारणी होत आहे. संस्थानचे माजी विश्वस्त राम मोरे म्हणाले की, दर्शनासाठी येणाऱ्या अनेक भाविकांना गावातील मुख्य मंदिर नेमके हे मंदिर कोणत्या बाजूला आहे हे माहित होत नव्हते. नामनिर्देश दर्शक फलक लावलेले नाहीत. अनेक भाविक गुगलवर सर्च करून दर्शनासाठी येत असतात. गुगलवर श्री संत तुकाराम महाराजांचे मूळ मंदिर दर्शवित नसल्याने भाविकांना मंदिराकडे जाण्यासाठी अडचण येत होती. ही अडचण दूर करण्यासाठी कमान उभारण्यात येत आहे.
प्रवेशद्वार कमान पूर्णत्वाकडे
By admin | Published: June 01, 2017 2:17 AM