पिंपरी : शहरातील पूर्णानगर, संभाजीनगर तसेच टेल्को रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर उग्र वास येत होता. त्याबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत महापालिकेच्या पर्यावरण विभागाने परिसरामध्ये पाहणी केली. त्यामध्ये टाटा मोटर्स कंपनीच्या पेंट शॉपमधून होत असलेल्या वायूगळतीमुळे दुर्गंधी पसरली असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे टाटा मोटर्स कंपनीला महापालिकेच्या पर्यावरण विभागाने नोटीस दिली.
टाटा मोटर्स कंपनीच्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली असल्याची तक्रार सारथी हेल्पलाईनवर स्थानिकांनी केली होती. त्यासाठी पर्यावरण विभागाने कंपनीला नोटीस दिली होती. त्यावर कंपनीने खुलासा दिला. मात्र, तरीही दुर्गंधी नेमकी कोणत्या कंपनीमधून येत आहे, याचा शोध लागत नव्हता. त्यासाठी पर्यावरण विभागाने स्थानिक नागरिक, कंपनीचे प्रतिनिधी व पदाधिकारी यांची अभ्यास समिती स्थापन केली. १७ फेब्रुवारीला समितीने जुने आरटीओ ऑफिस, पूर्णानगर, मटेरियल गेट, शाहूनगर, आयुक्त बंगला या परिसरामध्ये पाहणी केली मात्र, तरीही उग्र वास नेमका कोठून येत आहे, याची माहिती मिळाली नाही. त्यानंतर समितीने १८ फेब्रुवारीला कंपनीमध्ये पाहणी केली. कंपनीच्या पेंट शॉपमध्ये वायू गळती होत असल्याचे आढळले. त्यामुळे टाटा मोटर्स कंपनीला नोटीस देत तीन दिवसांमध्ये कार्यवाहीचा अहवाल द्यावा, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.
टाटा मोटर्स कंपनीच्या परिसरामध्ये दुर्गंधी येत होती. त्यासाठी अभ्यास समितीला कंपनीच्या आतमध्ये पाहणीवेळी पेंट शॉपमध्ये गळती होत असल्याचे आढळले. त्याबाबत कंपनीला नोटीस दिली होती. टाटा मोटर्सने त्यावर कार्यवाही केली असून, आता परिसरामधील दुर्गंधी बंद झाली आहे.
- संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता.