पिंपरी : विधिसंघर्षित बालकांना समुपदेशन करणे आणि त्यांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिघी पोलीस स्टेशन अंकित बालस्नेही पोलीस कक्षाचे सोमवारी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते उदघाटन झाले.
पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त (विशेष बालपथक गुन्हे, नोडल अधिकारी) डॉ. सागर कवडे, फॉर दि चिल्ड्रन फाउंडेशनच्या संस्थापिका कॅरोलीन ओड्वा दी वॉल्टर, दिघीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, महिला दक्षता कमिटी सदस्य आदी उपस्थित होते.
पीडित बालकांना पोलीस ठाण्यात भयमुक्त वातावरणात आपला जबाब नोंदवता यावा. विधिसंघर्षित बालकांशी पोलिसांना चर्चा करून त्यांचे समुपदेशन करता यावे यासाठी पोलीस ठाण्यात बालस्नेहीकक्ष ही संकल्पना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरू केली. त्यानुसार निगडी, हिंजवडी आणि आता दिघी पोलीस ठाण्यात हे कक्ष सुरू आहेत.
आगामी काळात आळंदी, देहूरोड, वाकड पोलीस ठाण्यात देखील हे कक्ष तयार केले जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत गंभीर गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांचे प्रमाण कमी करून त्यांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी मदत केली जात आहे. होतकरू मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या जात आहेत.