पिंपरी चिंचवड : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात पिंपरी चिंचवड शहराचे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले गेलेले आहे. या शहराला दैदिप्यमान इतिहासाची परंपरा आहे. या इतिहासाला त्यागाची आणि देशसेवेची किनार देणाऱ्या चापेकर बंधूंच्या हौतात्म्याचे चिरंतन स्मरण सर्वांना राहायला हवे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर चापेकर बंधूंविषयी गौरवोद्गार काढले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणा-या क्रांतिवीर चापेकर बंधूंचे चिरंतन स्मरण राहावे, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगावात उभारण्यात येणा-या त्यांच्या भव्य सहा मजली स्मारकाच्या दुस-या टप्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.चिंचवडगावातील मोरया गोसावी क्रीडांगण येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, खासदार श्रीरंग बारणे,आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, रवि नामदे, सतिष गोरडे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार आदी उपस्थित आहेत. फडणवीस म्हणाले, जो समाज इतिहास विसरतो, त्याला वर्तमानकाळ असतो, मात्र, भविष्यकाळ नसतो. क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या स्मारकातून नव्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे. संग्रहालयात क्रांतीकारकांची आठवण जागृत ठेवली जाणार आहे. क्रांतीकारकांच्या बलिदानाचे मोल समजले नाही तर स्वातंत्र्य धोक्यात येणार आहे. देशाचा इतिहास जागृत ठेवायला हवा. नवीन पिढीला सुराज्य द्यावे लागेल.समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचल्याशिवाय सुराज्य निर्माण होणार नाही. पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, क्रांतीवीर चापेकर समृती संग्रहालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ऐतिहासिक आहे. चापेकर बंधूंनी देशात आदर्श निर्माण केला. आता या स्मारकापासून तरुणांना निश्चित प्रेरणा मिळेल.
चापेकर बंधूंच्या हौतात्माचे चिरंतन स्मरण राहावे : देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 4:00 PM
क्रांतीकारकांच्या बलिदानाचे मोल समजले नाही तर स्वातंत्र्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे देशाचा इतिहास जागृत ठेवायला हवा : देवेंद्र फडणवीस
ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड महापालिका आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्मारकाची निर्मिती