- संजय माने ।लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पोलीस आयुक्तालय सुरू होऊन आठ महिने झाल्यानंतरही पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेले वाहनांचे तोडफोड सत्र अद्याप थांबलेले नाही. स्वत:च्या घरासमोर उभ्या केलेल्या वाहनाची तोडफोड करून परिसरात दहशती निर्माण करण्याचा प्रयत्न टोळक्यांकडून केला जात आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना नाहक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर तोडफोड सत्र थांबेल, अशी नागरिकांना अपेक्षा फोल ठरली आहे.
आयुक्तालय सुरू होण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात तोडफोडीच्या घटनांमध्ये रस्त्यावरील सुमारे ५०० हून अधिक वाहनांचे नुकसान झाले होते. पोलीस आयुक्तालय झाल्यानंतरही वाहनांच्या नुकसानीची आकडेवारी ३०० च्या घरात आहे. पिंपरी, चिंचवड, थेरगाव, भोसरी, निगडी, विठ्ठलनगर, काळेवाडी, वाकड, चिखली, घरकुल आदी भागांतील १५ हून अधिक टोळक्यांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तालय सुरू होण्यापूर्वी सुमारे ३० लोकांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. २० लोकांवर झोपडपट्टी दादा कायद्यांतर्गत कारवाई केलेली आहे. १५ आॅगस्ट २०१८ ला पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र आयुक्तालयाचा कारभार सुरू झाला. त्यानंतर आतापर्यंत १२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
दगडफेक करणाऱ्या टोळ्यांमधील आरोपींवर कायदेशीर कारवाई केली. तरीही वाहन तोडफोडीच्या घटनांना आळा बसलेला नाही.स्थानिक रहिवाशांमध्ये दहशत पसरविण्याच्या उद्देशाने आणि स्थानिक गुंडांमध्ये वर्चस्व सिद्ध करण्याच्या इराद्याने शहरात विविध ठिकाणीवाहन तोडफोडीच्या घटना घडल्याचा निष्कर्ष पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आला आहे. वाहन तोडफोडीच्या घटना घडण्यामागे आणखीही काही कारणे आहेत, की शहरात गुन्हेगारीचा नवा फंडा सुरू आहे, याची नेमकी कारणे पोलीस तपासात पुढे आलेली नाहीत़ त्यामुळे तोडफोडीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांच्या उपाययोजना कमी पडू लागल्या आहेत.जागा बळकाविण्यासाठीही वाहनांचे नुकसानवाहन तोडफोडीच्या घटना केवळ स्थानिक गुंडांच्या टोळक्याकडून नागरिकांमध्ये दहशत माजविण्याच्या उद्देशाबरोबर आणखीही कारणे असल्याचे काही घटनांमुळे उघड झाले आहे. मागील आठवड्यात नेहरूनगर येथे मोकळ्या मैदानात उभे केलेले चार मालवाहू ट्रकचे अज्ञातांनी दगडफेक करून नुकसान केले. रस्त्यालगत मोकळ्या जागेवर असलेल्या या मालवाहू वाहनांची तोडफोड करण्यामागील उद्देश वेगळाच आहे. त्या ठिकाणी रात्रीत टपऱ्या उभ्या केल्या जात आहेत. आगामी काळात ती जागा आणखी काही टपऱ्यांसाठी ताब्यात घ्यायची, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ट्रकवर दगडफेक केल्याचे बोलले जात आहे. त्या जागेवर डोळा ठेवून असलेल्यांचा हा प्रताप आहे. मोहननगर, रामनगर, तसेच थेरगावात काही घटनांमध्ये वैयक्तिक भांडणाची खुन्नस म्हणून वाहनांचे नुकसान करण्याच्या घटना घडल्या आहेत.
शहरात वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. तोडफोड करणाºया टोळक्यातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही काही ठिकाणी घटना घडत आहेत, या घटना घडण्यामागील नेमक्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे. याबाबतची माहिती मिळताच आणखी ठोस उपाययोजना केल्या जातील.- मकरंद रानडे , अतिरिक्त पोलीस आयुक्त