निशिकांत पटवर्धनपिंपरी : महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (टीएआयटी) १२ डिसेंबरला होत आहे. या परीक्षेतील काही परीक्षार्थींचे केंद्र हे २५० ते ३०० किलोमीटर अंतरावर असल्याने अनेक परीक्षार्थींनी ही परीक्षाच न देण्याचा निर्णय घेतला आहे. सोईच्या परीक्षा केंद्राअभावी अनेक शिक्षक परीक्षा न देताच नापास होणार असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.शिक्षक म्हणून नियुक्त होणाºया उमेदवारांकडे शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेबरोबरच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. राज्यातील शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य आहे. आता ही नवीन परीक्षा द्यावी लागणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार टीईटी परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांना यापुढे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.ही परीक्षा सर्व जिल्ह्यांतील केंद्रावर दि. १२ ते २१ डिसेंबरदरम्यान तीन बॅचमध्ये होणार आहे. नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई पूर्व, मुंबई पश्चिम, अकोला, नागपूर, जालना, औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर, परभणी, नांदेड, पुणे, रायगड, उस्मानाबाद, लातूर, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग अशी राज्यातील केंद्रे असणार आहेत. पहिली ते आठवीमधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी, तसेच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता चाचणीकरिता पात्र असतील.पुण्यातील उमेदवारांनी भरलेल्या अर्जात अनेकांचे परीक्षा केंद्र औरंगाबाद, नगर, सोलापूर, मुंबई, पालघर अशा ठिकाणी सुमारे २५० ते ३०० किलोमीटर अंतरावर असेल. साधारणपणे तेथे जाण्यासाठी चार ते पाच तासांचा कालावधी लागणार आहे. ज्यांची सकाळी नऊला परीक्षा आहे, त्यांनी किमान दोन तास आधी म्हणजेच सकाळी सातला परीक्षास्थळावर उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे.उमेदवारांना यासाठी आदल्या दिवशीच जावे लागणार आहे. प्रवासाचा वेळ, गाडीभाडे,राहण्याची सोय, उमेदवाराची रजा, महिला उमेदवार असल्यास त्यांना सोडायला येणाºयांची रजायाचा विचार केंद्राचे ठिकाण निवडताना केला गेलेला नाही. त्यामुळे परीक्षा देण्याआधीच उमेदवार नापास होणार आहे.उमेदवार त्याच्या सोईनुसार परीक्षेचा जिल्हा निवडू शकत असल्याने तीन पर्यायी जिल्हे यात समाविष्ट केले होते. मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर या शहरातील जिल्ह्यात ही परीक्षा होणार आहे. शक्यतो उमेदवारास त्याच्या पहिल्या पसंतीचा क्रमांक मिळावा, असा यात प्रयत्न केला जाणार होता. मात्र, अनेक उमेदवारांना त्यांनी निवडलेला पहिला पसंती क्रमांक न मिळता अन्य शहरातील कानाकोपºयातील जिल्हे मिळाले आहेत. मुंबई विभागात कांदिवली, पालघर, तर काहींना अमरावती, औरंगाबाद, नगर असे पुण्यापासून २५० किलोमीटर अंतरावरील परीक्षा केंद्र मिळाले आहे. यासाठी गाडी भाडे, सुटी, इतर खर्च पाहता प्रतिव्यक्ती सुमारे दोन ते तीन हजार रुपये मोजावे लागणार आहेत. एवढ्या लांब अंतरावर परीक्षेसाठी जाणे कसे परवडणार, असा सवाल उमेदवारांकडून केला जात आहे.पहिली बॅच सकाळी ९ ते ११, दुसरी बॅच १२.३० ते २.३० व तिसºया बॅचची वेळ ४ ते ६ अशी आहे. परीक्षार्थींना किमान दोन तास आधी केंद्रावर पोहोचणे बंधनकारक आहे.काय होणार साध्य?अनेक जणांना आॅनलाइन पैैसे भरत असताना अडचणी आल्या. बँक खात्यातून पैैसे जाऊनही परीक्षा फॉर्मचे शुल्क न मिळाल्याचा मेसेज आल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला. याबाबत संपर्कासाठी देण्यात आलेल्या १८००-३०००-१६५६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता तासन्तास फोन लागत नसल्याच्या तक्रारीही अनेक परीक्षार्थींनी केल्याने शासन ही परीक्षा घेऊन काय साध्य करणार आहे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
परीक्षेआधीच विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’, २५० किलोमीटर अंतरावरील केंद्र मिळाल्याने वेळेत पोहोचणेच अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 6:54 AM