पिंपरी : समाधानकारक पाऊस न झाल्याने उन्हाळ्यात स्थिती कशी राहील? याबाबत प्रशासन सतर्क झाले आहे. पवना धरण भरले असले तरी शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. वर्षभर पिण्याचे पाणी पुरेल अशा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नियमित पाणीपुरवठा कधी होणार याबाबत नागरिक प्रश्न करीत आहेत.
पवना धरण शंभर टक्के भरले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र, शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची अडचण होणार आहे. कारण पावसाने ओढ दिली आहे. संभाव्य पाणीटंचाईसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. पाणीटंचाई आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
पवना धरण परिसरात शंभर टक्के पाऊस
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात शंभर टक्के पाणीसाठा आहे, तर पाऊसही गेल्या वर्षी एवढाच आहे. ग्रामीण भागात पावसाने ओढ दिल्यास मावळातील ग्रामीण भागात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
उपनगरांमध्ये टँकरचे पाणी
पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत पाणीपुरठ्यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मोशी, चऱ्होली, दिघी, आळंदीरस्ता, चिखली, तळवडे, ताथवडे, किवळे, विकासनगर, वाकड परिसरात गृहनिर्माण सोसायट्यांना टँकरने पाणी घ्यावे लागत आहे.
मावळात समाधानकारक पाऊस
मावळ परिसरात समाधान कारक पाऊस झाला आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याची समस्या नसेल, अशाा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
धरण भरले असतानाही गृहनिर्माण सोसायट्यांना पाणी पुरत नाही. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. सोसायट्यांना आर्थिक भार सोसावा लागत आहे. शहर परिसरातील सोसायट्यांना नियमित पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.
-संजीवन सांगळे, गृहनिर्माण सोसायटी असोसिएशन
दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असला तरी दिवसाला अर्ध्या शहरात ५४० एमएलडी पाणी पुरविले जात आहे. पाण्यात कपात केलेली नाही. पवना धरण भरले आहे. त्यामुळे वर्षभर पुरेल एवढे पाणी धरणात आहे.
-श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता